कोल्हापूर जिल्ह्यातील २०५ अंध व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रकाशकिरण, स्वयंसेवी संस्थांचा मोठा हातभार
By संदीप आडनाईक | Published: August 29, 2023 07:23 PM2023-08-29T19:23:30+5:302023-08-29T19:23:48+5:30
इथे होतात कॉर्नियाचे प्रत्यारोपण
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अपघाताने किंवा जन्माने अंधत्व आल्यामुळे अनेकांना अंधारात जगावे लागत आहे. मात्र नेत्रदान चळवळीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २०५ अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीला सहा नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. याला शासकीय तसेच खासगी नेत्ररुग्णालयांचीही मोठी साथ आहे.
कोरोना काळात नेत्रदान चळवळीला थोडा थंडा प्रतिसाद मिळाला असला तरी त्यानंतर नेत्रदानाची चळवळ वाढली आहे. सक्षम, सर्वमंगल सेवा संस्था यासारख्या स्वयंसेवी संस्थांचा यात मोठा हातभार आहे. नेत्रदानाबाबत गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सरकार महाराष्ट्र अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविते. आज, सेवा रुग्णालयात नेत्रदान जनजागृती पंधरवड्यास प्रारंभ होत आहे. २०२२ अखेर १६५ जणांनी नेत्रदान केले. मार्च २०२३ अखेर ४० जणांनी नेत्रदान केले, तर २० जणांवर नेत्रप्रत्यारोपण करण्यात आले आहे. वर्षभरात ४०० हून अधिक जणांनी नेत्रदान करण्यासाठी अर्ज भरून दिला आहे.
या आहेत जिल्ह्यातील नेत्रपेढ्या
सीपीआर नेत्रपेढी, ज्ञानशांती रुग्णालय (डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय), ॲस्टर आधार रुग्णालय, प्रगती नेत्ररुग्णालय, राजारामपुरी, अंकुर नेत्ररुग्णालय, गडहिंग्लज, आदित्य नेत्र रुग्णालय, इचलकरंजी
इथे होतात कॉर्नियाचे प्रत्यारोपण
शहरातील ७ ठिकाणी कॉर्निया प्रत्यारोपणाची सोय आहे. यात डॉ. सौरभ पटवर्धन यांचे नंदादीप नेत्ररुग्णालय, राजारामपुरी येथील डॉ. अतुल जोगळेकर यांचे प्रगती नेत्ररुग्णालय याशिवाय कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, गडहिंग्लज येथील अंकुर नेत्ररुग्णालय, इचलकरंजी येथील आदित्य नेत्ररुग्णालयात या कॉर्निया ट्रान्सप्लान्ट सेंटरमध्ये कॉर्निया प्रत्यारोपण होते.
बुबुळ म्हणजेच कॉर्नियाच्या आजारांसाठी म्हणजेच बुबुळावर डाग येणे, संसर्ग होणे, व्रण अशा नेत्रविकारांवर प्रत्यारोपण करून दृष्टी सुधारता येते. नेत्रदानात डोळ्याच्या अन्य कुठल्याही भागाचा वापर होत नाही. एका व्यक्तीमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळते. -डॉ. चेतन खारकांडे, नेत्रविकारतज्ञ, कोल्हापूर
चेहरा विद्रूप होतो हा गैरसमज दूर केला पाहिजे. प्रत्यारोपणात आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे डोळे मिळवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. सहा तासांच्या आत नेत्रप्रत्यारोपण होणे गरजेचे आहे. -डाॅ. सुजाता वैराट, नेत्रविभाग प्रमुख, सीपीआर, कोल्हापूर
जिल्हा नेत्ररुग्णालयामधील नेत्रपेढी सक्षमपणे काम करत आहे. लवकरच आणखी चार नेत्रपेढ्या सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होतात. -डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, सीपीआर