खिद्रापूर मंदिराच्या संवर्धनासाठी २१ कोटी, लवकरच काम सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 01:30 PM2024-08-21T13:30:17+5:302024-08-21T13:30:49+5:30
आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती
शिरोळ : बाराव्या शतकातील शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेल्या हेमाडपंथी श्री कोपेश्वर मंदिर जतन, संवर्धन व परिसराचा विकास करण्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून २१ कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाल्याने श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर परिसराचा विकास होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटमध्ये या कामाचा समावेश केला होता. या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासंदर्भात किमया कॉन्सर्वेशन व आर्किटेक या फर्मची नेमणूक केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मंदिराचा अहवाल सादर केला. अतिवृष्टी व सातत्याने आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराला तडे गेले होते व झीज झाली होती. त्या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसराचे सुशोभीकरण या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अधिन असल्याने या मंदिरच्या जतन व संवर्धनाच्या प्रस्तावाला केंद्रीय पुरातत्व विभागाने मान्यता दिली.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन, दगडी फरस बंदी तसेच परिसराचा विकास करण्यासाठी २१ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून प्रत्यक्षात लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सहकार्य लाभले. प्राचीन शिल्पकलेचा नमुना असलेल्या हेमाडपंथी कोपेश्वर मंदिराला अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे तडे जाऊन व झीज होऊन मंदिराला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या मंदिराचे जतन व संवर्धन करणे गरजेचे होते. त्यानुसार या मंदिराला निधी प्राप्त झाला असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. या निधीमुळे भाविकांसह पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.