२१ फुटी महागणपती विसर्जनासाठी थेट छ. शिवाजी चौकात आल्याने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:34+5:302021-09-21T04:25:34+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींच्या उंचीला मर्यादा घातली असतानाही ते पोलीस यंत्रणेला चकवा देत छत्रपती ...

21 feet Mahaganapati is directly for immersion. Tensions due to Shivaji Chowk | २१ फुटी महागणपती विसर्जनासाठी थेट छ. शिवाजी चौकात आल्याने तणाव

२१ फुटी महागणपती विसर्जनासाठी थेट छ. शिवाजी चौकात आल्याने तणाव

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींच्या उंचीला मर्यादा घातली असतानाही ते पोलीस यंत्रणेला चकवा देत छत्रपती शिवाजी चाैक तरुण मंडळाचा २१ फुटी महागणपती विसर्जनासाठी थेट छ. शिवाजी महाराज चौकात आणल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना देत पुढच्या काही तासातच महागणपतीचे इराणी खणीत विसर्जन केले. त्यानंतर पोलिसांनी नि:श्वास सोडला.

राज्य सरकारने ४ फूट उंचीपेक्षा जादा उंचीच्या गणेशमूर्तींना बंदी घातली आहे. त्यामुळे गतवर्षीपासून छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फूट उंच महागणपतीची मार्केट यार्डमध्ये प्रतिष्ठापना केली होती, यंदाच्या वर्षी त्या महागणपतीचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले होते. महागणपती विसर्जनासाठी मंडळाच्या संयोजकांनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, पण विसर्जन मार्गावर भाविकांची गर्दी होणार यामुळे महागणपती पूर्णपणे झाकून पहाटेच्या सुमारास इराणी खणीत विसर्जन करण्यासाठी अनुमती दिली होती. त्यानुसार रविवारी पहाटे पावणेदोन वाजता मार्केट यार्डमधून महागणपती बाहेर काढला. पण तो इराणी खणीकडे जाण्याऐवजी पोलिसांना गाफील ठेवून थेट पहाटे सव्वातीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात आणला. सकाळी सात वाजता चौकात महागणपतीची मूर्ती पाहताच पोलीस प्रशासनाची भंबेरी उडाली. अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी तातडीने चौकात येऊन मंडळाच्या संयोजकांना जाब विचारला. यावेळी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच पोलीस फौजफाटा चौकात आला. पोलिसांनी संयोजकांना तातडीने महागणपतीची आरती करण्यास भाग पाडले, फुलांच्या उधळीत महागणपती विसर्जनासाठी बाहेर काढला. यावेळी पोलीस प्रशासनाशी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांची शाब्दिक वादावादीही झाली. पोलिसांनी ट्रॅक्टरभोवती कडे करत कमीत कमी कार्यकर्ते विसर्जनात सहभागी होतील अशा सूचना दिल्या.

महागणपती विसर्जनासाठी बाहेर पडल्याची वार्ता शहरभर पसरली तसे दर्शन घेण्यासाठी भाविकांचे लोंढे विसर्जन मार्गावर येऊ लागले. पोलिसांनी बळाचा वापर करत भाविकांना विसर्जन मार्गावर येऊ दिले नाही. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत मुंगीच्या पावलाने पुढे सरकणारा महागणपती यंदा प्रचंड बंदोबस्तात अवघ्या साडेतीन तासात पोलिसांनी इराणी खणीवर आणला. दुपारी चार वाजता विसर्जन झाल्याने पोलिसांनी नि:श्वास सोडला.

वळंजूसह १०० कार्यकर्त्यावर गुन्हे

एकवीस फुटी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करुन गर्दी जमवत विसर्जन मिरवणूक काढल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केेले. वळंजूसह उपाध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, दिलीप खोत, कमलाकर पोवार, प्रसाद वळंजू, नंदकिशोर जमदाडे, महमंद पठाण, पंडितराव पोवार, प्रमोद सुतार, नितीन पाटील या पदाधिकाऱ्यांसह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

Web Title: 21 feet Mahaganapati is directly for immersion. Tensions due to Shivaji Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.