कोल्हापूर जिल्ह्यात २१०९ लम्पीबाधित जनावरे, करवीरमध्ये अधिक फैलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:51 AM2023-09-05T11:51:33+5:302023-09-05T11:51:49+5:30
दगावलेल्या जनावरांना मदत
कोल्हापूर : जिल्ह्यात लम्पीने बाधित जनावरांची संख्या वाढत असून, सध्या २१०९ जनावरे बाधित आहेत. करवीर तालुक्यात लम्पीचा अधिक फैलाव असून भुदरगड व राधानगरी तालुक्यातील संसर्ग काहीसा नियंत्रित आल्याचे पशुसंवर्धन विभागाचा दावा आहे.
गेल्या वर्षभरापासून लम्पीने संपूर्ण महाराष्ट्रात संसर्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातून लम्पीचा संसर्ग सुरू झाला. बघता बघता जिल्ह्यात संसर्ग वाढत गेला. मध्यंतरी तीन-चार महिने संसर्ग काहीसा कमी झाला होता. आता पुन्हा लम्पीने डोके वर काढले असून करवीर, भुदरगड, राधानगरी तालुक्यात बाधित जनावरांची संख्या जास्त आहे.
लम्पीची लागण सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ९ हजार ३४ जनावरे बाधित झाली. त्यापैकी ७ हजार १७३ जनावरे औषधोपचारानंतर बरी झाली आहेत. तर ७५२ जनावरे दगावली आहेत. सध्या करवीर तालुक्यात लम्पीचा संसर्ग वाढला आहे. मात्र, औषधोपचार वेळेत होत असल्याने जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी आहे.
दगावलेल्या जनावरांना मदत
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीने दगावलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत ७५२ पैकी ४३१ पशुपालकांना मदत दिली आहे.
दृष्टिक्षेपात लम्पीबाधित जनावरे
एकूण बाधित : ९०३४
सध्या सक्रिय : २१०९
पूर्णपणे बरी झालेली : ७१७३
मृत्युमुखी : ७५२
मदत मिळालेली : ४३१
अशी मिळते मदत :
बैल : २५ हजार रुपये
गाय : ३० हजार रुपये
वासरू : १६ हजारांपर्यंत