चांदोली धरणात २१.२२ टीएमसी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:38+5:302021-04-03T04:20:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : चांदोली धरणात सध्या २१.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे गतवर्षीइतकाच पाणीसाठा याहीवर्षी धरणात शिल्लक आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण : चांदोली धरणात सध्या २१.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे गतवर्षीइतकाच पाणीसाठा याहीवर्षी धरणात शिल्लक आहे. त्यामुळे पुढील हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.
चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. दरवर्षी धरण शंभर टक्के भरते. याहीवर्षी धरण शंभर टक्के भरले होते. सध्या धरणात २१.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाची पाणीपातळी ६११.८५ मीटर इतकी आहे. धरणातून हिवाळ्यामध्ये दर २१ दिवसांनी, तर उन्हाळ्यामध्ये दर १५ दिवसांनी कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे चांदोलीचा परिसर सतत सुजलाम् सुफलाम् असतो.
सध्या १,९८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
धरणातील सद्य:स्थितीचा असलेल्या पाणीपातळीचा विचार करता ऑक्टोबर ते मार्चअखेर सहा महिन्यांत १३.१८ टीएमसी पाणीसाठा संपला आहे. यावरून प्रत्येक महिन्याला साधारण २.१९ टीएमसी पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे महिन्याला तीन टीएमसी पाणी सोडले तरी ६ टीएमसी पाणी संपेल. मेअखेरपर्यंत धरणात १५ टीएमसी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने या पाण्याचा अंदाज घेऊन पाण्याची टंचाई भासणार नाही व धरण तळही गाठणार नाही, असे नियोजन करणे गरजेचे आहे.
फोटो:
चांदोली धरण (छाया : सतीश नांगरे)