कॅनडात नोकरी देण्याचा फंडा, २.१९ लाखांचा ऑनलाईन गंडा; बँक खाते हॅक करुन रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:25 PM2022-08-03T13:25:27+5:302022-08-03T13:25:59+5:30
संशयित हॅकर्सने त्यांच्या जॉइंट बॅक खात्यावरील २ लाख १९ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले
कोल्हापूर : कॅनडा येथे भरघोस पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून बँक खाते हॅक करून त्यावरील रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून एकाला सुमारे २ लाख १९ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याबाबत फसवणूक झालेले आकाश अजित गोटडकी (वय ४३, रा. रिंगरोड, राजेंद्रनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत राज जैन व मनोज पटेल (रा. ग्राऊंड फ्लोअर, गाला हाऊस कर्टर रोड, बोरीवली, ईस्ट मुंबई) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश गोटडकी हे मार्केटिंगचा व्यवसाय करतात. त्यांना नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे संशयित राज जैन नामक व्यक्तीने आपल्या मोबाइल नंबरच्या व्हॉट्सॲपवरून फिर्यादी गोटडकी यांच्या व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. कॅनडामध्ये जॉब असल्याची बतावणी केली. त्याकरिता एका बँकेत वैयक्तिक खाते तसेच पत्नीसोबत आणखी एक जॉइंट खाते उघडण्यास भाग पाडले.
जॉबसाठी जाॅइंट खात्यावर २ लाख २० हजार रुपये भरण्यास लावले. फिर्यादी यांनी पैसे भरल्यानंतर संशयितांनी त्याचा विश्वास संपादन केला. संशयिताने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचे डेबिट कार्ड व त्याचा पिन कोड नंबर घेतला. त्यानंतर फिर्यादी गोटडकी यांच्या अपरोक्ष त्यांचे जाॅइंट खाते संशयिताने हॅक केले. तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नींना मोबाइल चार तास बंद ठेवण्यास सांगितले.
या वेळेच संशयित हॅकर्सने त्यांच्या जॉइंट बॅक खात्यावरील २ लाख १९ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. ही घटना दि. १५ ते ३१ जुलै दरम्यान घडली. जॉइंट खात्यावरील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच गोटडकी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.