चारू चांदणेविरोधात २२ परिस्थितिजन्य भक्कम पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 07:01 PM2017-08-08T19:01:39+5:302017-08-08T19:01:44+5:30
कोल्हापूर : देवकर पाणंद-शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्याविरोधात परिस्थितिजन्य असे २२ भक्कम पुरावे सिद्ध झाले आहेत. चांदणे याने दर्शनचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून करून, त्याला तेथीलच जवळ असणाºया विहिरीत फेकून दिले, असा युक्तिवाद सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केला. मंगळवारी येथील जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ अॅड. निकम यांनी युक्तिवाद केला. याची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
दर्शन शहा या शाळकरी मुलाचा २५ डिसेंबर २०१२ रोजी खून झाला. या प्रकरणी संशयित योगेश उर्फ चारू चांदणे याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. या खून खटल्याची सुनावणी एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी सकाळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी, दर्शन शहाचा निर्घृणपणे चांदणेने खून केला आहे. या खटल्यात एकूण ३० साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये २२ परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी सिद्ध झाली आहे. चांदणेला पैशांची चणचण होती. त्याने माजी नगरसेवक महेश गायकवाड व सागर कटके यांच्याकडून पैसे घेतले होते. त्याने पैसे परत केले नाहीत. पैशांसाठी दर्शन शहाच्या खुनापूर्वी धनत्रयोदशीदिवशी नोव्हेंबर २०१२ मध्ये स्मिता शहा (दर्शनची आई) यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या हाती काही लागले नाही. गायकवाडचे एक लाख रुपयांतील ७० हजार, तर कटकेचे ५८ हजार रुपये चांदणे देणे लागत होता.
खून झाल्यादिवशी २५ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आदित्य डावरे व सागर चौगले या दोघा साक्षीदारांनी जाताना, तर निखिल मोहिते याने रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास चांदणेला धावत येताना पाहिले होते. दुसºया दिवशी दर्शन शहाचा मृतदेह तेथील विहिरीत मिळून आला. दरम्यान, तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी ३ जानेवारी २०१३ रोजी घटनास्थळाचा पंचनामा करीत असताना विहिरीपासून सुमारे ५० फूट अंतरावर दर्शनचे चप्पल त्यांना सापडले. तसेच दर्शनच्या शवविच्छेदन अहवालात सीपीआर रुग्णालयाचे डॉक्टर अविनाश वाघमारे यांनी दर्शनचा खून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून झाला, असे म्हटले आहे. त्यानुसार केडगे यांनी चारू चांदणेकडून गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त केली.
सुनंदा कुलकर्णी यांना २६ डिसेंबर २०१२ रोजी स्मिता शहा यांच्या घराजवळ चिठ्ठी निदर्शनास आली. त्यांनी ती स्मिता शहा यांना दिली. त्या चिठ्ठीमध्ये ‘२५ तोळे सोने दिले नाही, तर दर्शन शहाचे तुकडे करू,’असा मजकूर लिहिला होता. ही चिठ्ठी चारू चांदणेनेच लिहिली असल्याचा तपासात उलगडा झाला, असा युक्तिवाद करून अॅड. निकम यांनी, स्मिता शहा यांनी २५ डिसेंबर २०१२ रोजी जुना राजवाडा पोलिसांत दर्शन बेपत्ता असल्याची तक्रार रात्री ११ वाजता दिली होती. त्याचबरोबर दर्शनच्या शहाच्या कपड्याचे बटण १८ जानेवारी २०१३ रोजी घटनास्थळावरून केडगे यांनी जप्त केले. तसेच हे बटण दर्शनच्या शर्टला तंतोतंत जुळत असल्याचा निर्वाळा हस्ताक्षरतज्ज्ञ जयसिंग लाडगे यांनी दिला, असा युक्तिवाद केला. सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड. पीटर बारदेस्कर, तपास अधिकारी यशवंत केडगे उपस्थित होते.
अॅड. निकम यांनी मांडलेले मुद्दे
* दर्शन गायब असल्याची स्मिता शहा यांनी २५ जानेवारी २०१२ रोजी पोलिसांत दिलेली तक्रार
* पैशाच्या चणचणीमुळे चारू चांदणे याने दोघांकडून उसने घेतलेले पैसे
* साक्षीदारांनी चांदणे याला पाहिलेल्या साक्षी
* चांदणेनेच चिठ्ठीतील मजकूर लिहिल्याचा तपासात उलगडा
* दर्शनचे घटनास्थळावरून सापडलेले शर्टचे बटण.