कोल्हापुरातील प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये २२ कनिष्ठ निवासी पदे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:03 PM2018-10-08T18:03:03+5:302018-10-08T18:07:21+5:30
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) २२ कनिष्ठ निवासी पदे या महिन्याअखेर भरण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या कनिष्ठ निवासी-एक यांची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे.
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) २२ कनिष्ठ निवासी पदे या महिन्याअखेर भरण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या कनिष्ठ निवासी-एक यांची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित ‘सीपीआर’ रुग्णालय येते. प्रामुख्याने बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी), शस्त्रक्रिया विभाग, आदी ठिकाणी कनिष्ठ निवासी कार्यरत आहेत. अर्जदार हा किमान एम. बी. बी. एस. उत्तीर्ण व एम. एम. सी.चा कायमस्वरूपी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
एम. बी. बी. एस व डी. एन. बी.च्या उमेदवारांनी त्यांच्या विभागप्रमुखांमार्फत अर्ज सादर करावेत. कनिष्ठ निवासी-एक या पदासाठी २० आॅक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे, तर २५ ला मुलाखती अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर हे अधिष्ठाता कार्यालयात घेणार आहेत.
कनिष्ठ निवासी हे पद सहा महिन्यांसाठी असणार आहे. यासाठी वयाची कोणतीही अट नाही आहे. जनऔषध वैद्यकशास्त्र (पी. एस. एम) विभागात सर्वाधिक चार, तर जीवरसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र या विभागांत प्रत्येकी तीन आणि शरीररचनाशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, क्ष-किरणशास्त्र, आदी ठिकाणी प्रत्येकी दोन, छाती व क्षयरोगशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, आदी विभागात प्रत्येकी एक अशी एकूण २२ पदे भरण्यात येणार आहेत.
यासाठी वैद्यकीय शिक्षण यांची मंजुरी घेण्यात आली आहे. कनिष्ठ निवासी पदांची सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर संबंधिताला पुन्हा कनिष्ठ निवासी पदाला अर्ज करता येतो, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.