जिल्ह्यातील २२ दूध संस्थांवर फौजदारी होणार
By admin | Published: March 4, 2015 12:37 AM2015-03-04T00:37:45+5:302015-03-04T00:42:44+5:30
गोकुळ दूध संघ निवडणूक : अहवाल वरिष्ठांकडे; १४३ हरकती नामंजूर, ३८ मंजूर
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या प्राथमिक मतदार यादीमध्ये समावेश व्हावा, यासाठी कागदपत्रांत फेरफार करणे, इतिवृत्तात बेकायदेशीर बदल करणे अशा प्रकारे दुबार ठराव केलेल्या जिल्ह्यातील २२ दूध संस्थांवर सहकार कायदा १४६ नुसार फौजदारी कारवाई होणार आहे. मंगळवारी प्रारूप मतदार यादीवरील हरकतींच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले आहे. एकूण हरकतींपैकी १४३ हरकती फेटाळल्या असून, ३८ मंजूर केल्या आहेत. संघासाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविले होते. ३२६३ पैकी ३२६२ ठराव दाखल झाले. यांपैकी २२ संस्थांचे ठराव दुबार झाले होते. हे ठराव दाखल करणाऱ्या दोन्ही गटांना नोटिसा काढल्या होत्या. याबाबत सुनावणी होऊन कागदपत्रांची पडताळणी करून पात्र-अपात्र ठरविले.
दरम्यान, १८१ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यांची सुनावणी पूर्ण करून निकाल जाहीर केला. दुबार ठराव दाखल केलेल्या २२ संस्थांपैकी १३ संस्थांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नामंजूर केला आहे. सात संस्थांतील ठरावदार यादीत राहणार आहेत. कागल तालुक्यातील सांगाव येथील हनुमान दूध संस्था अवसायनात काढली आहे. तरीही या संस्थेतून दिलीप पाटील, रंगराव पाटील यांचे ठराव आले होते. ते दोन्ही नाकारण्यात आले. दुबार ठरावांपैकी ‘शिवाजी महिला’च्या आशालता देसाई, ‘केदारलिंग’च्या अमर जाधव, ‘महालक्ष्मी’च्या दामोदर मस्कर, ‘हनुमान’च्या बाजीराव भोसले, ‘ज्योतिर्लिंग’च्या अनिल संकपाळ यांचा ठराव पात्र ठरला आहे. सुनावणीवेळी संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे हजर न केल्यामुळे या सात संस्थांतील विरोधी गटांचे ठराव अपात्र ठरविले आहेत.
कारवाईस पात्र संस्था अशा
आजरा : कामधेनू (भादवण), करवीर : चंद्राबाई (कणेरीवाडी) व ओम गणेश (केर्ली), कागल : बसवेश्वर (सुळकूड), तुळजाभवानी (सोनगे), स्वामी समर्थ (माद्याळ), ओम गणेश (केंबळी), हनुमान (मौजे सांगाव), छत्रपती शाहू (हणबरवाडी), गगनबावडा : बावेली दूध, पावनाईदेवी (असंडोली), केदारलिंग (निवडे), गडहिंग्लज : जिजामाता (दुंडगे), श्रीपंत मातोश्री (बेळगुंदी), चंदगड : भैरवनाथ (सुळये),पन्हाळा : ज्योतिर्लिंग (पिंपळे तर्फ सातवे), राधाकृष्ण (यवलूज), लक्ष्मी महिला (सुळे), भुदरगड - शिवाजी महिला (झावरेवाडी), राधानगरी- महालक्ष्मी महिला (कपिलेश्वर), शाहूवाडी- भाग्यलक्ष्मी (कातळेवाडी), गणेश महिला (सावर्डे खुर्द).
हरकतीच्या सुनावणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सुनावणीवेळी दुबार ठरावाच्या वेळी नियमबाह्यपणे कागदपत्रांचा फेरफार करणे, इतिवृत्तात बदल करणे, चुकीच्या पद्धतीने संचालकांची नियुक्ती करणे अशा विविध कारणांमुळे २२ संस्था फौजदारीस पात्र ठरल्या आहेत. सहनिबंधक यांच्याकडे अहवाल पाठविणार आहे. चौकशीनंतर कारवाई होईल. २२ पैकी सात ठरावधारक पात्र ठरले तरी कारवाईपासून सुटका अटळ आहे. - दिग्विजय राठोड,
विभागीय उपनिबंधक (दुग्ध)