कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार महिन्यांत २२ खून, ६ अनैतिक संबंधातून!
By उद्धव गोडसे | Published: May 23, 2024 12:10 PM2024-05-23T12:10:34+5:302024-05-23T12:11:12+5:30
क्षणिक रागामुळे आयुष्याची होते राखरांगोळी
उद्धव गोडसे
कोल्हापूर : रागाच्या क्षणावर नियंत्रण मिळवता आले नाही तर वाद होऊन विपरीत घडते. रागाच्या भरात हातून गुन्हा घडतो अन् त्याची शिक्षा दोषींसह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागते. आर्थिक नुकसान आणि कुटुंबांची फरफट होते. त्यामुळे अशा घटना टाळण्याचे भान असायलाच हवे. जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांत खुनाच्या २२ घटना घडल्या. यातील सहा खून अनैतिक संबंधातून, तर चार खून आर्थिक वादातून झाले आहेत.
कौटुंबिक वाद, आर्थिक वाद आणि अनैतिक संबंधातून होणारे वाद हाणामारीपर्यंत पोहोचतात. क्षणिक रागाच्या भरात हाती लागेल ती वस्तू समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घातली जाते. काही वेळा कट रचून अडसर ठरणाऱ्या व्यक्तीचा काटा काढला जातो. पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी विकास पाटील या तरुणाचा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या साडेचार महिन्यांत जिल्ह्यात एकूण २२ खून झाले. यातील सहा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आर्थिक वाद, शेतीचा वाद, गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष यातूनही खुनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात इचलकरंजीसह परिसरात सर्वाधिक खून होतात.
राग का येतोय?
बदलत्या जीवनशैलीत माणसांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षा पूर्ण होत नसल्याने अपेक्षाभंगातून दु:ख वाढते. यातून परिस्थिती, आसपासच्या व्यक्ती, नातेवाइकांबद्दल मनात राग निर्माण होतो. भौतिक सुविधांना प्राधान्य देताना भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होते. क्षमतांपेक्षा जास्त मिळवण्याचा हव्यास आणि याची पूर्तता होण्यात अडचणी येताच माणसांचा रागाचा पारा वाढतो. तो नियंत्रित ठेवण्यासाठी संवाद आणि विवेकी वृत्ती जागृत ठेवणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.
दोन कुटुंबांची वाताहत
पोर्ले तर्फ ठाणे येथे रविवारी झालेल्या खुनामुळे विकास पाटील हा घरातील कर्ता तरुण गेला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले आणि भाऊ असा परिवार आहे. कर्ता तरुण गेल्यामुळे पाच-सहा एकर शेती, १० ते १२ जणावरांचा भार आता कुटुंबीयांवर पडला. बापाविना मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे. दुसरीकडे हल्लेखोर युवराज गायकवाड याचेही कुटुंब उद्ध्वस्त झाले. सैन्यदलात नोकरी करून मिळवलेला मानसन्मान एका क्षणात धुळीस मिळाला. त्याच्यासह साथीदारांना आता अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतील. या काळात कुटुंबांची फरफट होणार. शिवाय कुटुंबांची बदनामी न भरून निघणारी असेल. अशा घटना टाळण्यासाठी नैतिक आचरण हाच महत्त्वाचा उपाय आहे.
असे घडले २२ खून
- अनैतिक संबंध - ६
- आर्थिक वाद - ४
- पूर्ववैमनस्य - ३
- प्रेम संबंध - २
- कौटुंबिक वाद -१
- अज्ञात कारण -१
- इतर कारणांवरून - ५
अनैतिक संबंधातून खुनांचे प्रमाण वाढणे हे बिघडत्या सामाजिक वातावरणाचे प्रतीक आहे. अशा घटना संबंधित कुटुंबांवर आणि समाजमनावरही गंभीर परिणाम करतात. नैतिक आचरणातून अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा