‘एकटी’कडे २२ टन प्लास्टिकचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:57 AM2018-04-02T00:57:15+5:302018-04-02T00:57:15+5:30

22 ton plastic pile on 'Ekati' | ‘एकटी’कडे २२ टन प्लास्टिकचा ढीग

‘एकटी’कडे २२ टन प्लास्टिकचा ढीग

Next

तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात कचरा, प्लास्टिक हा यक्षप्रश्न बनला असून, कोल्हापुरानेही आता प्लास्टिकबंदीचे पाऊल उचलले आहे; पण ‘एकटी’ या कचरावेचक महिलांच्या सामाजिक संस्थेने कचऱ्यातून निवडलेले निरुपयोगी सुमारे २२ टन प्लास्टिक जमा करून घेण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. महाडिक वसाहतीमधील जागेत हे प्लास्टिकचे ढीग दिवसेंदिवस वाढत असल्याने संस्थेसमोर हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘एकटी’ संस्थेतर्फे कचरावेचक महिलांच्या वतीने शहराच्या प्रत्येक प्रभागातील रोज २७०० घरांतील कचरा, भाजी मंडईतील कचरा जमा करून त्याचे विलगीकरण केले जाते. या कचºयातील निरुपयोगी प्लास्टिक बाजूला काढून इतर कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. १४ जून २०१६ च्या शासकीय अध्यादेशानुसार निरुपयोगी प्लास्टिक जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही त्या-त्या महापालिकेची आहे. त्यातच ‘एकटी’ संस्थेसोबत कोल्हापूर महापालिकेने जुलै २०१७ मध्ये करार केला. त्यामध्ये मनपा हद्दीतील भाजीपाला व फळ मार्केट, हॉटेल तसेच व्यापारी परिसरातील दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा संकलन व ओला-सुका कचरा असे विलगीकरण करून त्यातून निघणारे निरुपयोगी प्लास्टिक मनपाकडे जमा करावे, असेही स्पष्ट म्हटले आहे.
कचºयातून निघणारे निरुपयोगी प्लास्टिक एकत्र करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मार्केट यार्ड परिसरातील महाडिक वसाहत येथे सव्वादोनशे स्क्वेअर फूट जागेतील शेड दिले आहे; पण जुलैपासून आजपर्यंत या ठिकाणचे प्लास्टिक महापालिकेने उचललेच नाही; त्यामुळे हा ढीग वाढून आता तो शेडबाहेर रस्त्यावर आला. ते उचलावे यासाठी ‘एकटी’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी मनपाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आयुक्तांच्या भेटी घेतल्या; पण फक्त आश्वासनच हाती मिळाले. या संस्थेकडे सुमारे २२ टन निरुपयोगी प्लास्टिक जमा असून, महापालिका कधी उचलते या विवंचनेत ‘एकटी’ संस्था आहेत.
मनपा चौकात प्लास्टिक ‘डंपिंग’चा इशारा
कराराप्रमाणे निरुपयोगी प्लास्टिक महापालिकेने उचलणे बंधनकारक असताना त्याकडे महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे; पण आता हा विषय आमच्या आवाक्याबाहेर जात असून, महापालिकेने ते आठवड्यात न उचलल्यास सर्व २२ टन निरुपयोगी प्लास्टिक डंपरमध्ये भरून ते महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आणून टाकण्याचा इशारा ‘एकटी’ संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी दिला आहे.
....पण महापालिका जागा देत नाही
हे प्लास्टिक शास्त्रोक्त पद्धतीने कापून ते रस्त्याच्या कामात वापरले जाते. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेडिंग मशीन देण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास मनपा पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक उत्सुक नाहीत.
निरुपयोगी प्लास्टिक रक्षणासाठी पहारेकरी
महाडिक वसाहतीमध्ये शेडमध्ये असलेले हे निरुपयोगी प्लास्टिक आता वाढून शेडबाहेर रस्त्यावर आले. परिसरातील लोकांतून ओरड होऊ लागली आहे. कोणीतरी रागात ते पेटविण्याची शक्यता असल्याने हे निरुपयोगी प्लास्टिक रक्षणासाठी आता ‘एकटी’ संस्थेला पहारेकरी ठेवण्याची वेळ आली आहे.

Web Title: 22 ton plastic pile on 'Ekati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.