संकलन दुरूस्तीचे २२ वर्षे काम रेंगाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:28+5:302020-12-25T04:20:28+5:30
आजरा : उचंगी धरणग्रस्तांचे गेली २२ वर्षे संकलन दुरूस्तीचे काम झालेले नाही. त्यामुळे गुरुवारी धरणग्रस्तांनी धरणस्थळावर जाऊन धरणाचे काम ...
आजरा : उचंगी धरणग्रस्तांचे गेली २२ वर्षे संकलन दुरूस्तीचे काम झालेले नाही. त्यामुळे गुरुवारी धरणग्रस्तांनी धरणस्थळावर जाऊन धरणाचे काम बंद पाडले. धरणग्रस्तांचे निवेदन घेण्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले नाहीत, म्हणून ठेकेदाराच्या प्रतिनिधीला मागणीचे निवेदन देऊन काम थांबविण्यात आले. उचंगी धरणाचे काम २००० पासून सुरू आहे. धरणाचे काम ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले. परंतु, धरणग्रस्तांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. गेली २० ते २२ वर्षे प्रशासनासोबत बैठका, चर्चा होऊनही धरणग्रस्तांचे प्रश्न तसेच आहेत. धरणग्रस्तांनी धरणाला कधीही विरोध केलेला नाही. परंतु, धरणग्रस्तांचे प्रश्न न सुटल्याने धरणाचे काम बंद करण्याची वेळ धरणग्रस्तांवर आली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळ व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा होऊन धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे ठरले होते. ते अद्यापही झालेले नाही. चाफवडे गावातील उजव्या तीरावरील रस्ता करणे, चाफवडे गावातील १५० घरांचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे, ६५ टक्के रक्कम प्रकल्पग्रस्तांची भरून घ्यावी, धरणग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान वाटप करण्यात यावे, चित्रीच्या लाभक्षेत्रात जमीन वाटप केलेल्या धरणग्रस्तांना राहण्यासाठी जमीन वाटप करण्यात यावी, सरकारी जमीन विल्हेवाटसंबंधी निर्वाह धारण क्षेत्र हे शिल्लक राहिलेली जमीन कमी असल्याने अशा ४० धरणग्रस्तांना धरणग्रस्त म्हणून मान्यता द्यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
* फोटो ओळी :
उचंगी धरणाचे काम थांबविण्याचे निवेदन ठेकेदाराच्या प्रतिनिधीला देताना धरणग्रस्त. दुसऱ्या छायाचित्रात धरणाचे काम बंद पाडण्यासाठी प्रकल्पस्थळावर जमा झालेले धरणग्रस्त.
क्रमांक : २४१२२०२०-गड-०७/०८