शहरात २२ हजारांवर दुबार नावे

By admin | Published: September 29, 2015 12:47 AM2015-09-29T00:47:22+5:302015-09-29T00:48:02+5:30

राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीची तक्रार : १७ हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात

22,000 duplicate names in the city | शहरात २२ हजारांवर दुबार नावे

शहरात २२ हजारांवर दुबार नावे

Next

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे २२ हजार ६९६ मतदारांची दुबार नावे असल्याचा तसेच १७ हजार ६३ मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडीने केला असून, त्याबाबतच्या लेखी पुराव्यांसह आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती दुरुस्ती करून मतदारांना न्याय दिला नाही, तर मात्र नाइलाजाने आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागले, असा इशारा आघाडीचे प्रवक्ते प्रा. जयंत पाटील व गटनेते राजेश लाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांतील प्रारूप मतदार याद्यांवर राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजप, जनसुराज्य, आदी विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले होते. त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीने सोमवारी २२ हजार ६९६ मतदारांची दुबार नावे तसेच १७ हजार ६३ मतदारांची नावे ते ज्या प्रभागात राहतात, तेथील मतदार यादीत न समाविष्ट होता ती अन्य प्रभागांत समाविष्ट झाल्याची बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिली आहे. विधानसभेच्या यादीत ज्यांची नावे होती, परंतु मनपाच्या यादीत दिसत नाहीत असे ५८ मतदार आढळून आले आहेत. म्हणजे त्यांना मतदानास मुकावे लागणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात असलेले, परंतु आता दक्षिणमध्ये समावेश झाला आहे असे १८०० मतदार आढळून आले आहेत. त्यामुळे या मतदारांच्यावतीने प्रा. जयंत पाटील व राजेश लाटकर यांनी लेखी तक्रार प्रशासनाकडे दिली. ही तक्रार देताना मतदाराचे नाव, पत्ता, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग यासह सर्व माहिती देण्यात आली आहे.
प्रा. जयंत पाटील म्हणाले की, मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत. आम्ही आमच्या यंत्रणेतून मतदार यादींची शोधमोहीम हाती घेतली आणि झालेल्या वास्तव चुका प्रशासनासमोर मांडल्या आहेत. मतदार यादीतील या चुका मुद्दाम घडवून आणलेल्या आहेत, असा आमचा दावा आहे.

प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचीही हरकत
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी सदोष व बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी केला असून या प्रारूप मतदार यादीवर पक्षाच्यावतीने हरकती घेण्यात आल्या आहे. याबाबत आयुक्तांना पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले असून सुचविलेल्या हरकतींवर कोणताही विचार न केल्यास न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असाही इशारा पत्रकाद्वारे केला आहे. हरकतींमध्ये म्हटले की, एकूण ८१ प्रभागांपैकी ९ प्रभागांत ७००० ते ८१६५ अशा मतदारांची नोंद प्रारूप मतदार यादीत केली आहे. त्या प्रभागाचे क्र. २५, २७, ३१, ३२, ३३, ४८ असे आहेत. या प्रभागांत पूर्वीपासून रहिवाशी असलेल्या बहुतांश नागरिकांची नावे या मतदारसंघांत संबंधित प्रभागांत नमूद केलेली नाहीत. ती नावे त्या मतदारांशी संबंधित नसलेल्या इतर जवळच्या व लांबच्या प्रभागात जाणूनबुजून समाविष्ट केलेली आहेत.

Web Title: 22,000 duplicate names in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.