कोल्हापूर लोकसभेसाठी २३ तर, हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात; शेट्टींना मिळालं 'शिट्टी' चिन्ह
By पोपट केशव पवार | Published: April 22, 2024 06:27 PM2024-04-22T18:27:23+5:302024-04-22T18:30:43+5:30
विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ४ जण तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे कोल्हापुरातून २३ उमेदवार रिंगणात असून हातकणंगलेत २७ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. गत निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात १५ तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात हाेते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यातील एक अर्ज छाननीत बाद झाल्याने २७ उमेदवरांचे अर्ज शिल्लक राहिले. सोमवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. यापैकी ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या मतदारसंघात २३ उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. दरम्यान, या मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला आहे.
दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी ४ अर्ज छाननीत बाद झाल्याने ३२ अर्ज शिल्लक राहिले. यातील पाच जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने या मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
शेट्टींना पुन्हा मिळाली शिट्टी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना शिट्टी हे त्यांचे आवडते चिन्ह मिळाले. यापूर्वी २०१४ मध्ये याच चिन्हावर निवडणूक लढवित त्यांनी लोकसभा गाठली होती. गत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी हेच चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती. आता २०२४ च्या निवडणुकीत शिट्टी चिन्ह मिळण्याचा आग्रह स्वाभिमानीने धरला होता. दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराने त्यावर दावा सांगितला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वाभिमानीला त्यांच्या मागणीनुसार शिट्टी चिन्ह दिले.