किसान रेल्वेतून २.३ टन भाजीपाल्यासह इतर पार्सल रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 06:02 PM2020-08-21T18:02:23+5:302020-08-21T18:03:45+5:30
मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली.
कोल्हापूर : मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली.
कोरोनामुळे रेल्वेची यंत्रणा ठप्प झाली आहे. अशा काळात रेल्वेला गती देण्यासाठी प्रशासनाने पार्सल वाहतुकीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमालासह इतर पार्सलसाठी एका विशेष अशा किसान रेल्वेची सोय केली आहे. त्यानुसार शुक्रवारी कोल्हापुरातील छत्रपती शाहू टर्मिनस येथून पहाटे साडेपाच वाजता रेल्वे मनमाडकडे रवाना झाली.
पाच डबे असणाऱ्या रेल्वेमध्ये सव्वादोन टन भाजीपाल्यासह इतर पार्सल होती. ही रेल्वे मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर या मार्गांवरून शेतीमाल घेऊन साधारणत: सायंकाळी ६.२५ वाजता मनमाड येथे पोहोचणार आहे.
रविवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता ती मुझफ्फरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर सोमवारी (दि. २४) सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी देवळाली येथे पोहोचेल. ही विशेष रेल्वे सेवा २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, कोल्हापुरातून प्रत्येक शुक्रवारी ती मनमाडसाठी सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.