कोल्हापूरचे २३ हजार विद्यार्थी उद्या देणार ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा
By संदीप आडनाईक | Published: April 29, 2023 07:48 PM2023-04-29T19:48:59+5:302023-04-29T19:50:39+5:30
यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज, दि. ३० एप्रिल (रविवारी) सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत कोल्हापूर शहरातील ७१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २३ हजार विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. परीक्षार्थींना केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता बोलावण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी १), मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक, टंकलेखक, आदी एकूण ८१६९ पदांसाठी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ ही परीक्षा राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होत आहे. लिपिक टंकलेखक संवर्गातील सर्वाधिक ७०३४ पदांसाठी राज्यभरातून विद्यार्थी बसलेले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ७१ केंद्रांसाठी इचलकरंजी, पेठवडगाव, वारणानगर, कागल, निगवे यांसारख्या ठिकाणांवरील विविध शाळा या परीक्षांसाठी प्रशासनाने घेतल्या आहेत. यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, त्यामुळे परीक्षाकेंद्रांची संख्याही प्रशासनाने वाढविली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय १८ समन्वय अधिकारी आणि तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.