वसंतदादा साखर कारखान्यास २४ कोटींचे कर्ज
By Admin | Published: April 17, 2016 12:40 AM2016-04-17T00:40:34+5:302016-04-17T00:42:32+5:30
जिल्हा बॅँक : तत्त्वत: मान्यता, ४२ कोटी रुपयांची केली होती मागणी
सांगली : आर्थिक वर्ष संपताना जिल्हा बँकेच्या थकबाकीचे ६२ कोटी रुपये भरणाऱ्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २४ कोटी रुपयांच्या कर्जास शनिवारी जिल्हा बँक कार्यकारी समितीच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. कारखान्याने एकूण ४२ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती, मात्र समितीने अंशत: कर्जास मान्यता दर्शविली आहे.
जिल्हा बँकेने २0१५-१६ या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद नुकताच पूर्ण केला. बँकेला एकूण ८२ कोटींचा ढोबळ नफा झाल्याने बँकेचा राज्यात गवगवा झाला. नफ्याचा हा आकडा वाढण्यामागे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची थकबाकी वसुली कारणीभूत ठरली. कारखान्याने ३१ मार्च रोजी ६२ कोटी रुपये भरले होते. थकबाकीदारांच्या यादीत वसंतदादा कारखानाच अव्वल होता. त्यामुळे कारखान्याकडील वसुली हे सर्वात मोठे उद्दीष्ट घेऊन बँक प्रशासन काम करीत होते. त्यामुळे सेक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत कारखान्यास जप्तीची नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर ३१ मार्च रोजी कारखान्याने ६२ कोटीची संपूर्ण थकबाकी भरल्याने बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला.
कर्ज भरतेवेळी जिल्हा बँक अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी कारखाना अध्यक्ष विशाल पाटील यांना पुन्हा कर्ज मिळविण्यासाठी कारखाना पात्र झाल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखान्याकडून पुन्हा कर्जाचा प्रस्ताव सादर होणार, याची दाट शक्यता दिसत होती. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच कारखान्याने पुन्हा ४२ कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव जिल्हा बँकेकडे सादर केला.
जिल्हा बँकेच्या शनिवारी झालेल्या कार्यकारी समितीसमोर हा प्रस्ताव चर्चेला आला. बँकेने पूर्ण कर्ज मंजूर केल्यास आर्थिक फिरवाफिरवीची चर्चा होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यकारी समितीने २४ कोटी रुपये अंशत: कर्ज मंजूरीस तत्त्वत: मान्यता दिली आहे. कवठेमहांकाळच्या महांकाली कारखान्यास १0 कोटीचे अल्पमुदत कर्जही यावेळी मंजूर केले.
थकबाकीची पूर्ण रक्कम कारखान्याने भरल्यामुळे पुन्हा कर्ज घेण्यासाठी ते पात्र ठरलेले आहेत. तरीही पैसे भरल्यानंतर १५ दिवसात कर्जाचा प्रस्ताव सादर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)