आयकर भरणाऱ्या ३४०० शेतकऱ्यांकडून २.४० कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:34+5:302020-12-06T04:24:34+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू ...

2.40 crore recovered from 3400 farmers paying income tax | आयकर भरणाऱ्या ३४०० शेतकऱ्यांकडून २.४० कोटी वसूल

आयकर भरणाऱ्या ३४०० शेतकऱ्यांकडून २.४० कोटी वसूल

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आयकर भरणाऱ्या ३८३२ शेतकऱ्यांपैकी ३४०० शेतकऱ्यांनी दोन कोटी ४० लाख रुपये सरकारला परत केले आहेत. उर्वरित ४३२ शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी मंगळवार (दि. ८)पर्यंत मुदत दिली आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यातून पाच लाख ३७ हजार २१ शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेत सहभाग घेतला हाेता. चुकीची माहिती भरून पेन्शन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाच्या वतीने संबंधित खात्यांची चौकशी सुरू केली. यामध्ये निकषांचे उल्लंघन केलेले १८ हजार लाभार्थी आढळले. त्यांमध्ये ३८३२ शेतकरी हे आयकर भरणारे असल्याचे स्पष्ट झाले. आयकर विभागानेच ही यादी दिल्याने शासनाकडून त्यांची वसुली सुरू केली. संबंधित शेतकऱ्यांना लाभ घेतलेली रक्कम परत करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत ३४०० शेतकऱ्यांनी २ कोटी ४० लाख रुपये शासनाला परत केले आहेत. अजून ४३२ शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाहीत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महसूल यंत्रणा त्यात गुंतली होती. त्यात काही सुट्या आल्याने आणखी तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत पैसे भरले नाहीत तर बुधवारपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

आयकर भरणाऱ्यांसह जमीन नावावर नसलेले, तरुण, पती-पत्नी दुहेरी लाभ घेतलेलेही आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या श्रावणबाळ, संजय गांधीसह इतर पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ३७५० लोकांनी ‘पी. एम. किसान’चा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडूनही वसुली केली जाणार आहे. त्यांना आठवड्यात नोटिसा काढून डिसेंंबरअखेर वसुली केली जाणार आहे.

कारवाईची शेतकऱ्यांमध्ये धास्ती

शासनाने पैसे परत न करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. त्यामुळेच आयकर भरणाऱ्यांनी तातडीने पैसे परत केले.

लाभार्थ्याकडून पैसे वसूल करण्याची पहिलीच वेळ

चुकीच्या पद्धतीने शासकीय अनुदान घेतलेल्यांकडून वसुलीच्या घटना घडल्या असतील. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: 2.40 crore recovered from 3400 farmers paying income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.