फळपिकांच्या विमारकमेत २५ ते ५० टक्के कपात

By admin | Published: November 6, 2014 08:57 PM2014-11-06T20:57:09+5:302014-11-07T00:08:44+5:30

विमा कंपन्यांचा दबाव : कोल्हापूर जिल्ह्यातील केळी, द्राक्ष, आंबा बागायतदारांना बसणार फटका

25 to 50 percent reduction in fruit crops | फळपिकांच्या विमारकमेत २५ ते ५० टक्के कपात

फळपिकांच्या विमारकमेत २५ ते ५० टक्के कपात

Next

प्रकाश पाटील - कोपार्डे --बदलत्या तापमानासह वेगवान वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसाने होणारे फळपिकांचे नुकसान व संबंधित शेतकऱ्यांना बसणारा फटका लक्षात घेऊन शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानाधारित पथदर्शक फळपीक विमा योजना याहीवर्षी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी विविध फळपिकांसाठी पूर्वी ठरविलेल्या विमा संरक्षण रकमेत तब्बल २५ ते ५० टक्क्यांनी कपात केली आहे. यात राज्यातील १२ जिल्ह्यांनाच लक्ष्य करीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.
द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा, काजू, आदी निवडक फळपिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी हवामानावर आधारित फळपीक योजनेचा पहिला टप्पा राज्यभरात राबविला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. योजनेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता यंदा दुसऱ्या टप्प्यातील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने १० सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार कृषी विभागाने द्राक्ष, संत्रा, मोसंबी तसेच डाळिंब, पेरू, केळी, आंबा व काजू या फळपिकांचा हवामानावर आधारित विमा योजनेत अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
दरम्यान, विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतली. विमा कंपनीच्या दबावापुढे झुकलेल्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपातीचा सुधारित निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे हित न पाहता विमा कंपन्यांच्या अरेरावीपुढे कृषी विभागाने नांगी टाकली आहे. महिन्याभरातच आधीचा शासन निर्णय फिरविण्यात आला आहे. त्यातही सर्व खटाटोप विशेषत्वाने खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणातील १२ जिल्ह्यांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, नगर, लातूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. विमा संरक्षित रकमेत व शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्यात कपात झाल्यानंतर विमा योजनेतील केंद्र व राज्य हिश्श्यातही आपोआपच कपात झाली आहे.

फळपीकलाभक्षेत्रपूर्वीची विमा संरक्षण रक्कम (हेक्टरी)सुधारित विमा रक्कमही हेक्टरी
केळीजळगाव१ लाख५० हजार
केळीधुळे, बीड, कोल्हापूर, बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजार
मोसंबीनगर, बीड, नागपूर, बुलडाणा, वर्धा, उस्मानाबाद६० हजार४५ हजार
द्राक्षबीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद१ लाख ५० हजार१ लाख १२ हजार
आंबाबीड, कोल्हापूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजार
काजूरायगड, रत्नागिरी, कोल्हापूर७५ हजार५६ हजार २५०
डाळिंबनगर, बीड, बुलडाणा, धुळे, लातूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजार


उसाला मिळणारा दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा केळी, आंबा लागवडीकडे वळविला आहे; मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने केळी व आंबा पिकांचे मोठे नुकसान होत होते. शासनाने फळपीक विमा योजना राबविली; पण त्यात कपात करून शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागणार आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच योजना मार्गी लावावी.
-विठ्ठल पाटील, शेतकरी संघटना, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा

Web Title: 25 to 50 percent reduction in fruit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.