तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २५ कोटी मिळणार
By admin | Published: May 18, 2016 11:16 PM2016-05-18T23:16:24+5:302016-05-19T00:42:46+5:30
अधिवेशनात घोषणेची शक्यता : वास्तुसंवर्धन, भाविकांना सुविधा, आपत्ती व्यवस्थापनासह विकासकामे होणार
इंदुमती गणेश -- कोल्हापूर --करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात २५ कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे. या रकमेत वास्तुसंवर्धन, भाविकांना सुविधा व आपत्ती व्यवस्थापन ही विकासकामे करण्यात येणार आहेत. अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी महापालिकेने २५५ कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. यातून मंदिराचा तीन टप्प्यांमध्ये विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७२ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. या टप्प्यातील विकासकामांबाबतची बैठक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात एकाच तीर्थक्षेत्राला एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करता येणार नसल्याने २५ कोटींच्या कामांची निश्चिती करण्यात आली आहे. जून-जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांंतर्गत या निधीला मंजुरी मिळणार आहे. त्यानुसार मंदिर वास्तू संवर्धन देवस्थानच्यावतीने तर परिसरातील उद्यान, कारंजे, स्वच्छतागृह ते जुना राजवाडा ही कामेमहापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहेत. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी दर्शन मंडप, पादचारी मार्ग, सुविधा केंद्र, वाहनतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सेवावाहिन्या हलविणे ही कामे करण्यात येणार आहेत. दिशादर्शक फलक, जाहिरात, सूचना फलक या कामांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठीची प्रस्तावित कामे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्याचे नियोजन आहे.
आराखड्यात एकाच शाळेचा समावेश
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंदिराला लागून असलेल्या विद्यापीठ हायस्कूलचा समावेश आहे. येथे भाविकांना विश्रांतीची सोय व बगीचा करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेनेही स्थलांतराची तयारी दाखविली होती.
या दोन्ही शाळा मध्यवर्ती परिसरात आहेत. शिवाय येथे मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे अद्याप शाळांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला नाही. याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुट्यांमुळे तो होऊ शकला नाही.
मंदिरासाठी देवस्थानची
५ कोटींची तरतूद
मंदिराच्या चारही दरवाज्यांच्या आत असलेल्या मुख्य परिसरासाठी देवस्थान समितीकडून ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्य मंदिर, नगारखाना, परिसरातील ओवऱ्या या हेरिटेज वास्तूंचे जतन आणि संवर्धन तसेच संरक्षक भिंतीचे काम या रकमेतून करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांनी दिली. तसेच भक्त निवासाची जबाबदारीही देवस्थानकडे निश्चित करण्यात आली आहे.