अडीच कोटींचे कांदा अनुदान जमा, कोल्हापूर बाजार समितीची यंत्रणा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:20 PM2019-02-23T18:20:56+5:302019-02-23T18:23:11+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीशी संलग्न ३९७७ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २ कोटी ५९ लाख रुपयांचे कांदा अनुदान मंजूर झाले आहे. ही रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीशी संलग्न ३९७७ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २ कोटी ५९ लाख रुपयांचे कांदा अनुदान मंजूर झाले आहे. ही रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली होती. घाऊक बाजारात दीड-दोन रुपये प्रतिकिलोने शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागल्याने मोठे नुकसान झाले होते. सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घेतले. कोल्हापूर बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात ४००४ अर्ज आले होते. या अर्जांची सरकारच्या निकषांप्रमाणे छाननी करण्यात आली. त्यातील २७ शेतकरी अपात्र ठरले. पात्र ३९७७ शेतकऱ्यांचे अर्ज अनुदान मागणीसाठी सरकारकडे पाठविले होते. या शेतकऱ्यांना २ कोटी ५९ लाख ३ हजार ८०० रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे हे अनुदान आले असून, त्यांची शेतकरीनिहाय छाननी करून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात १०५१ अर्ज
राज्य सरकारने १५ डिसेंबरपर्यंत अनुदान योजना जाहीर केली होती; पण या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी झाल्यानंतर सरकारने त्यास मुदतवाढ दिली. जानेवारीअखेर १०५१ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी होऊन ते अनुदानासाठी पाठविले जाणार आहेत.