माजलगावकरांचा मदतीचा हात, कोल्हापूरच्या मृत जवानाच्या कुटुंबियांसाठी दिवसात जमा केले २५ लाख
By समीर देशपांडे | Published: September 21, 2022 06:51 PM2022-09-21T18:51:38+5:302022-09-21T18:54:43+5:30
माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोल्हापूर : माजलगाव जि. बीड येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या आपत्कालीन मदत पथकातील राजशेखर मोरे यांचा सोमवारी मृत्यू झाला होता. आपल्या गावी आलेल्या जवानाचा असा मृत्यू माजलगावकरांच्या जिव्हारी लागला. यातूनच सर्वांनी बुधवारच्या एका दिवसात मोरे यांच्या कुटुंबियांसाठी २५ लाख रूपयांचा मदतनिधी गोळा केला आहे. यातील सुमारे पावणे सात लाख रूपये कुटुंबियांच्या खात्यावर जमाही करण्यात आले.
माजलगाव धरणात पोहताना तेथील डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर आपत्कालीन पथकाचे सदस्य माजलगावला गेले होते. परंतू यातील राजशेखर यांचा मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी परिस्थिती बेताची असून त्यांना लहान मुले असल्याने माजलगावकरांनी निर्धार करत बुधवारी मदतफेरी काढली.
दिवसभरात सुमारे २५ लाख रूपये संकलित झाले आहेत. आणखी १० लाख रूपये गोळा करून ते सर्व पैसे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.