कारखानदाराची अडीच लाखांची रोकड लंपास
By admin | Published: June 3, 2014 01:05 AM2014-06-03T01:05:28+5:302014-06-03T01:25:44+5:30
बसस्थानकातील घटना; चेकबुक्स, एटीएम, पॅनकार्ड चोरीस
कोल्हापूर : ‘तुमच्या नोटा पडल्या आहेत, असे सांगून कारखानदाराच्या चारचाकी गाडीत ठेवलेल्या बॅगेतील दोन लाख ६० हजार रुपयांची रोकड अज्ञाताने हातोहात लंपास केल्याची घटना आज, सोमवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरदिवसा घडली. याबाबतची फिर्याद प्रकाश सदाशिव महाडिक (वय ६१, रा. दत्तकुंज अपार्टमेंट, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलिसांत रात्री दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रकाश महाडिक हे आज मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेम्सटोन या इमारतीमध्ये असलेल्या एका खासगी बँकेत पैसे काढण्यासाठी आले. दुपारी बँकेतून पैसे काढून ते इमारतीबाहेर आले. गाडीत बसले असताना त्यांच्याजवळ एक अज्ञात व्यक्ती आली. त्याने ‘आपल्या गाडीच्या पाठीमागे पैसे पडले आहेत’ असे सांगितले. त्यानंतर महाडिक हे गाडीतून खाली उतरले. गाडीजवळ पडलेल्या दहा ५० रुपयांच्या नोटा ते उचलू लागले. तोपर्यंत त्यांच्या गाडीतील बॅग गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महाडिक यांनी बॅगेतील एक हजार रुपयांच्या २१० नोटा, पाचशे रुपयांच्या एक हजार नोटा, एक खासगी व एक राष्ट्रीयीकृत बँकेचे चेकबुक, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असल्याचे फिर्यादीत सांगितले. महाडिक यांनी हे पैसे कारखान्यातील कामगारांना पगारापोटी देण्यासाठी काढले होते.(प्रतिनिधी)