अडीच लाख बालके ‘आधार’विना

By admin | Published: May 18, 2015 11:38 PM2015-05-18T23:38:33+5:302015-05-19T00:23:35+5:30

जिल्ह्यात जूनअखेर उपक्रम : प्रशासनाची व्यापक मोहीम मात्र, यंत्रणा तोकडी

2.5 lakh children without 'base' | अडीच लाख बालके ‘आधार’विना

अडीच लाख बालके ‘आधार’विना

Next

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटांतील एक लाख ८६ हजार ८७०, तर सहा ते १४ वयोगटांतील ७३ हजार ९६३, अशी एकूण दोन लाख ६० हजार ८३३ बालके आधारकार्डविना असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व बालकांच्या आधारकार्डसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची मोहीम सध्या सुरू आहे. जूनअखेर सर्वांना आधारकार्ड देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंत्रणा तोकडी असल्यामुळे सर्व बालकांना ‘आधार’ देणे आव्हानात्मक बनले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. शून्य ते पाच वयोगटांतील बालकांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित आहार व आरोग्याची सुविधा पुरवली जाते.
सहा ते १४ वयोगटांतील मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र, नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. दरम्यान, नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची संख्या कळावी आणि प्रत्येक बालकाच्या आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लक्ष ठेवता यावे, तसेच लाभार्थी निश्चित करणे सोपे जावे, यासाठी शून्य ते १४ वयोगटांतील प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.
गेल्या महिन्यापासून एकात्मिक बाल विकास, प्राथमिक व माध्यमिक या विभागाचे प्रशासन तयारी करीत आहे. एकूण असलेल्या बालकांमध्ये आधारकार्ड असलेल्यांचा आणि नसलेल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये शून्य ते पाच वयोगटांतील एकूण दोन लाख सहा हजार ५४१ पैकी १९ हजार ६७१ बालकांकडे आधारकार्ड आहे; तर सहा ते १४ वयोगटांतील दोन लाख ७४ हजार ५८२ पैकी दोन लाख ११ हजार ४९ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड आहे.
आता सर्व बालकांना आधारकार्डसाठी शिक्षण विभागाने आॅनलाईन अर्ज भरून घेण्याचे गावनिहाय नियोजन केले आहे. मात्र, मशीन व मनुष्यबळ यांची कमतरता भासत आहे. शून्य ते पाच वयोगटांतील बालकांच्या आधारकार्डसाठीचे आॅनलाईन अर्ज भरतानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जूनअखेर सर्व बालकांना ‘आधार’ देणे आव्हानात्मक झाले आहे.


करवीर तालुक्यात सर्वाधिक बालके
आधारकार्ड नसलेल्या शून्य ते पाच वयोगटांतील बालकांची, तर कंसात सहा ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ३३२७ (७२३), भुदरगड - ९५५८ (५१९७), चंदगड - १२४३३ (५४२९), गडहिंग्लज - १२५२५ (६२६८), गगनबावडा - २३९६ (१४२५), हातकणंगले - २६४०३ (१५९७८), कागल - १६९२२ (१०१५४), करवीर - ४१७२९ (१०७०७), पन्हाळा - १७८८० (४४९७), राधानगरी - ११९४२ (४९४८), शाहूवाडी - १२४६५ (४६४१), शिरोळ - १९२९३ (४७१९).

सर्व बालकांना आधारकार्ड मिळावे, यासाठी गावनिहाय आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. अनेक गावांत केंद्रे सुरू झाली आहेत. जूनअखेर सर्व बालकांना आधार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. - स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी.


जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा शून्य ते पाच वयोगटांतील बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी केंद्र सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. - शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी महिला व बालकल्याण.

Web Title: 2.5 lakh children without 'base'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.