बाजार समितीच्या खर्चात २५ लाखांची वाढ
By admin | Published: June 28, 2016 12:03 AM2016-06-28T00:03:53+5:302016-06-28T00:46:14+5:30
प्रशासकच बरे म्हणण्याची वेळ : संचालकांचा आठ महिन्यांतील कालावधी विचार करायला लावणारा
राजाराम लोंढे -- कोल्हापूर --बाजार समितीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा ४७ लाख ७८ हजारांनी वाढ झाली असली तरी खर्चात मात्र २४ लाख ८९ हजारांनी वाढ झाली आहे. प्रशासकीय काळापेक्षा पंचवीस पटींनी खर्चात वाढ झाली असून, त्याचा परिणाम वाढाव्यावर होऊन १५ लाख ९० हजारांनी तुलनात्मक वाढावा कमी झाला आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात संचालकांना जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी मिळूनही वाढलेला खर्च पाहता, तो निश्चितच विचार करायला लावणारा आहे.
साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या समितीचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. मागील पाच वर्षांत संचालक मंडळाने केलेल्या कारभारामुळे समितीवर प्रशासक आले. प्रशासकांच्या दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळात उत्पन्नवाढीबरोबरच खर्चावर अंकुश राहिला. डॉ. महेश कदम व रंजन लाखे यांनी प्रशासक म्हणून येथे चांगले काम केले. समितीमध्ये सुरू असलेल्या खर्चाच्या जुन्या रूढी-परंपरांना पायबंद घालून त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. जुलै २०१५ मध्ये प्रशासकीय कारकिर्द संपुष्टात येऊन नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले. मागील संचालकांनी समितीची अब्रू वेशीवर टांगल्याने नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सभासदांची माफी मागत पुन्हा असा कारभार होणार नाही, असे सांगितले होते. नवीन संचालक मंडळ कार्यरत होऊन दहा महिन्यांचा कालावधी गेला आहे. या कालावधीत त्यांनी समितीच्या शिलकीतील सव्वादोन कोटींच्या रस्त्यासह वे ब्रिज, प्रवेशद्वारांची कामे केली आहेत. या कामांच्या उद्घाटनप्रसंगी नेत्यांनी संचालकांचे कौतुक केले असले तरी प्रशासकीय काळापेक्षा खर्चात झालेली वाढ निश्चितच विचार करायला लावणारी आहे. प्रशासक हा एकटा आणि संचालक मंडळ २१ जणांचे असले तरी खर्चात झालेली वाढ अनाकलनीय आहे. प्रशासकीय काळातील खर्च वाढीच्या प्रमाणापेक्षा पंचवीस पटींनी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची, तर संचालकांच्या दृष्टीने चिंतनाची बाब आहे.
ताळेबंदासाठी लपवाछपवी!
मार्च महिन्यानंतर सर्व विभागांचे उत्पन्न व खर्च यांचा ठोकताळा घालून वाढावा काढला जातो. साधारणत: एप्रिल महिन्यात समिती प्रशासनाकडे याची माहिती तयार असते; पण यावर्षी खर्चात वाढ झाल्याने ही माहिती देण्यासाठी प्रशासनाने गेले दोन महिने लपवाछपवी सुरू केल्याची चर्चा समितीत सुरू आहे.
घोषणांच्या पावसात शेतकऱ्यांची दिशाभूल
टेंबलाईवाडी धान्य बाजार, फूल बाजार, गूळ निर्यात झोन, शीतगृह प्रकल्प, आदींच्या घोषणांचा पाऊस समितीच्या गेल्या अनेक निवडणुकांत नेत्यांनी पाडला. आतापर्यंत थापा मारल्या, आता काही तरी करा, असे सांगण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.