२५ लाखांचा बाजार कट्टा पार्किंगसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:38+5:302021-02-17T04:28:38+5:30

सादिक नगारसे लोकमत न्यूज नेटवर्क हलकर्णी : परिसरातील वीस खेड्यांची बाजारपेठ असलेल्या हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील बाजार ...

25 lakh for market parking | २५ लाखांचा बाजार कट्टा पार्किंगसाठी

२५ लाखांचा बाजार कट्टा पार्किंगसाठी

Next

सादिक नगारसे

लोकमत न्यूज नेटवर्क

हलकर्णी : परिसरातील वीस खेड्यांची बाजारपेठ असलेल्या हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील बाजार वाहतूक व बसथांबा असलेल्या मुख्य चौकात पसरत आहे. यामुळे बाजारादिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. गावात खास बाजारासाठी २५ लाख रुपये खर्चून प्रशस्त बाजार कट्टा बांधण्यात आला असून, त्याचा पार्किंगसाठी वापर होत आहे. ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याने दिवसेंदिवस नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हलकर्णी येथे बुधवारी बाजार भरतो. परिसरातील १८ ते २० गावांतील ग्राहक व विक्रेत्यांचा राबता या बाजारात असतो. संकेश्वर, हत्तरकी यमकनमर्डी आदी कार्नाटकातील व्यापारी येथे व्यापारासाठी येतात, त्यामुळे स्वस्त बाजार म्हणूनही हा हलकणीचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात सकाळी सात वाजल्यापासून गर्दी होत असते. ज्या चौकात हा बाजार पसरतो तो चौक म्हणजे ए. आर. बेकरीपासून दक्षिणेकडे बसथांब्यापर्यंत आहे. येथे दुतर्फा अनेक व्यापारी ठाण मांडून बसतात. नेमक्या या ठिकाणी बसथांबा आहे. दुपारनंतर येथे गर्दी वाढते, त्यामुळे बस वळवणे व प्रवाशांना उतरवण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. मुख्य रस्ता असल्याने बस व अन्य वाहतूक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. (उद्याच्या अंकात कोडोली बाजार)

हा राहील पर्याय...

एरवी मुख्य बाजारपेठ लाईनमध्ये भरणारा हा बाजार व्यापारी व खेडूतांच्या संख्येत वाढ झाल्याने मुख्य चौकापर्यंत पसरला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून वापरावीना पडून असलेल्या बाजार कट्ट्याचा वापर करण्यास संबंधित व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीने सक्ती करणे गरजेचे आहे.

बाजार सोयीचा नाहीच.....

गावातील बाजार म्हणजे ग्रामपंचायत उत्पन्न मिळविण्याचे मुख्य साधन आहे. बाजारात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. मात्र, हलकर्णी बाजार याला अपवाद ठरत आहे. यासाठी हलकर्णी ग्रामपंचायत उदासीन आहे. ना पार्किंगची सोय, ना महिलांसाठी प्रसाधनगृह, उघड्यावर असलेले मच्छी मार्केट, मटण मार्केटचे पडके व गळके गाळे, ठरलेले ठेकेदार यामुळे त्याला आलेले गलिच्छ स्वरूप अन्‌ मध्ये-मध्ये होणारी व्यापाऱ्याची भांडणे, असे विद्रूप चित्र या हलकर्णी बाजाराचे आहे.

फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील आठवडी बाजार रस्त्यावरच भरत आहे. (फोटो-१६०२२०२१-कोल-हलकर्णी)

Web Title: 25 lakh for market parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.