कसबा बावड्यात २५ जणांना डेंग्यूची लागण
By admin | Published: May 19, 2016 12:58 AM2016-05-19T00:58:45+5:302016-05-19T00:59:08+5:30
नागरिकांत भीती : महापालिकेकडून सर्वेक्षण; तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना
कसबा बावडा : कसबा बावडा आणि परिसरात डेंग्यूच्या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या २५हून अधिक रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रुग्ण कसबा बावडा आणि कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी बावड्यातील नगरसेवकांनी महापालिका आरोग्य विभागाला लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत.
कसबा बावडा, लाईन बाजार, शुगरमिल, आदी परिसरातील लोकांना डेंग्यू झाला असल्याने डेंग्यूचा विळखा काही ठरावीक भागातच झाला असल्याचे स्पष्ट होते. ) संपूर्ण बावडा परिसरालाच डेंग्यूने विळखा घातलेला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बावड्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले. नंतर त्यात वाढ होत गेली. आता तर २५हून अधिक जणांना डेंग्यू झाल्याचे त्यांच्या रक्ताच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने याबाबत काही तरी उपाययोजना करावी, यासाठी स्थानिक नगरसेवकांनी महापौर, तसेच आरोग्याधिकारी यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभगाकडील कर्मचाऱ्यांनी बावड्यातील लॅबना भेटी देऊन रुग्णांची माहिती घेतली.
डेंग्यूचा प्रसार होत असताना महापालिका प्रशासनाकडून केवळ आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या डासांचा उपद्रव वाढला आहे.
पाटील गल्लीतील सहाजणांना डेंग्यू
मूळ गावठाणातील असलेल्या पाटील गल्लीत डेंग्यूचे सध्या सहा रुग्ण आहेत. यामध्ये तरुण मुले, महिला व काही लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
हत्तीरोग पसरविणारे डासही
बावड्यातील डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेचे कर्मचारी आणि मलेरिया निर्मुलन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली. पाण्याचे नमुने घेतले. यावेळी त्यांना डेंग्यूच्या डासांबरोबरच क्युनेक्स हे हत्तीरोग पसरवणारे डासही आढळले असल्याचे सांगण्यात आले.
बावड्यात डेंग्यूची साथ झपाट्याने वाढत आहे. सध्या २५हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत. अद्याप काही रुग्णांचे रक्ताचे रिपोर्ट यावयाचे आहेत. महापालिका प्रशासनाकडे याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात म्हणून आरोग्य विभागाला लक्ष घालण्यास सांगितले आहे. तसेच महापौरांनाही याची माहिती दिली आहे. - मोहन सालपे, नगरसेवक
अस्वच्छता आणि खूप दिवस साठवलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांचा फैलाव होऊन डेंग्युची साथ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी साठवणुकीचे पाणी उघडे ठेवू नये. तसेच ते वारंवार बदलत राहायला हवे.
- डॉ. नितीन पाटील, कसबा बावडा
गेल्या दीड महिन्यांत कसबा बावड्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता चार रुग्णांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. सध्याच्या परिस्थितीत सात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यापैकी एका रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने कसबा बावड्यात स्वच्छता मोहीम घेऊन औषध फवारणी केली आहे. साचलेल्या पाण्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने नागरिक पाण्याचा साठा करून ठेवतात, हेही डेंग्यू पसरण्याला मदत करते. महापालिकेच्यावतीने सर्व पातळीवर दक्षता घेतली आहे.
- डॉ. ए. डी. वाडेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोमनपा.