चिखली, आंबेवाडीत अद्याप अडकलेेत २५० जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:25+5:302021-07-25T04:21:25+5:30
मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महापुराचा कहर झाला. महापुराने करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विळखा घातल्याने अनेक ...
मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महापुराचा कहर झाला. महापुराने करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विळखा घातल्याने अनेक जण अडकले. पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच काहींनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला होता; पण अनेकांनी पुराची तीव्रता न भासल्याने घर न सोडता पहिल्या मजल्यावर अगर टेरेसवर आसरा घेतला.
चिखली व आंबेवाडी गावात अनेक दुभती जनावरे असल्याने गतवर्षीचा अनुभव पहाता अनेकांनी आपली दुभत्या गायी, म्हशी ही जनावरे अगोदरच सुरक्षितस्थळी नेऊन ठेवली होती. प्रशासनाने राबवलेल्या मदतकार्यात गेल्या दोन दिवसात महापुरात अडकलेल्या सुमारे साडेआठशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले. एनडीआरएफ’च्या बोटीतून हे वेगाने मदतकार्य सुरू आहे.
शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली, पुराचे पाणी काही अंशी उतरल्याने महापुरात अडकलेल्यांना दिलासा मिळाला, पण महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी उतरेल, या अपेक्षेने शनिवारी चिखलीत अडकलेले नागरिक घर सोडण्यास तयार नाहीत. अक्षरशा मदतकार्यातील लोक महापुरात अडकलेल्यांना हातापाया पडून बाहेर पडण्यासाठी आवाहन करीत आहेत; पण त्याला तितकासा प्रतिसाद दिला जात नव्हता. दिवसभरात सुमारे दोनशे नागरिकांना मदतकार्य राबवून महापुरातून बाहेर काढले. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचा समावेश आहे.
घरे, गुऱ्हाळघरे पाण्याखाली
चिखली व आंबेवाडी ही तसे गुऱ्हाळघराची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोन गावात सुमारे २० हून अधिक गुऱ्हाळघरे आहेत; पण महापुरामध्ये ही सर्वच गुऱ्हाळघरे पूर्णपणे पाण्याखाली गेली. या ठिकाणी फक्त गुऱ्हाळघराच्या आवारातील गवतांच्या गंजीच दिसत होत्या. याशिवाय बहुतांशी घरेही पाण्याखाली अडकली आहेत. या दोन गावातील बहुतांशी सर्वच घरे, इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी दुपारी चिखली गावात सुमारे १० ते १२ फूट महापुरातील पाणी पातळी होती.
मदतीची याचना, पण प्रत्यक्षात नकार
महापुरात अडकलेल्या चिखलीतील काहींनी शनिवारी सकाळी नियंत्रण कक्षाला फोन करून आम्हाला महापुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार शिवाजी पूल येथून एनडीआरएफच्या बोटी पुराच्या पाण्यातून वाट काढत चिखली गावात पोहोचल्या; पण तेथे पोहोचल्यानंतर विनंती केलेल्यांनी बाहेर पडण्यास नकार दिल्याने मदतकार्यातील जवान संतप्त झाले.