‘टोल’चे २५०० जणांवरील खटले काढणार
By admin | Published: February 12, 2016 12:53 AM2016-02-12T00:53:13+5:302016-02-12T00:53:26+5:30
प्रक्रिया सुरू : प्रशासनास मात्र शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; कृती समितीच्या मागणीची घेतली दखल
गणेश शिंदे-- कोल्हापूर कोल्हापूरच्या ऐतिहासिक टोलविरोधी आंदोलनातील सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यांत नोंद झालेले खटले काढून टाकण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे.
गेल्या रविवारी (दि. ७) येथे झालेल्या टोल रद्दच्या विजयोत्सवी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी तसे थेट आदेश जिल्हा पोलीसप्रमुखांना दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही सुरू झाली आहे. एकूण ५४ दखलपात्रसह ६३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अदखलपात्र नऊ गुन्ह्यांंचा समावेश आहे. गुन्ह्यांमध्ये लाखो रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
या आंदोलनात एकूण किती जणांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती पोलिसांकडून जमा करण्यात येत आहे. एकूण ५४ गुन्हे नोंद आहेत. हा प्रत्येक गुन्हा सरासरी ५० जणांवर नोंद आहे. त्या हिशेबाने सुमारे अडीच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामध्ये एकच गुन्हा अनेक कार्यकर्त्यांवरही दाखल झालेल्यांची संख्याही जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हे अडीच हजार असले तरी कार्यकर्त्यांची संख्या चौकशीत कमी होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील टोल रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर शहर टोलविरोधी कृती समितीच्यावतीने रविवारी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कृती समितीने व सार्वजनिक बांधकाम मंत्री (विशेष प्रकल्प) एकनाथ शिंदे यांनीही खटले काढून टाकण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले होते.
कोल्हापुरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून ‘आयआरबी’ कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ (बीओटी) तत्त्वावर सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते बांधले. हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याने शहरवासीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
गेली पाच वर्षे विविध माध्यमांतून आंदोलनाची धार वाढवत नेली. त्याची दखल राज्यकर्त्यांना घ्यावी लागली व टोल रद्दचा निर्णय झाला; परंतु आता त्यासाठी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी पुढे आली व तिचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन खटले काढून टाकण्याचे आदेश दिले.
नऊ अदखलपात्र...
शाहूपुरी, राजारामपुरी व करवीर या पोलीस ठाण्यांत अदखलपात्र असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. अदखलपात्र गुन्हे म्हणजे पोलिसांनी घेतली नाही तरी चालते. पण, संबधिताला ताकीद देणे, असे स्वरूप आहे.
कोल्हापुरातील टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या दाखल झालेले गुन्हे काढून टाकावेत, या मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. पण, शासनाचा याबाबतचा आदेश अद्याप आलेला नाही. त्यांचा आदेश आल्यावर आम्ही टोल आंदोलनातील गुन्ह्यांचा प्रस्ताव शासनास सादर करू. - प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक,कोल्हापूर.
प्रक्रिया अशी...
गृह विभागाने हे खटले काढून घेण्यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनास आदेश द्यावे लागतील. त्यानुसार पोलीस प्रशासन शासनास त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करेल. हा प्रस्ताव गृहविभागाकडून पुन्हा विधि व न्याय विभागाकडे जाईल व त्यानंतर न्यायालयातून हे खटले काढून टाकण्याची कार्यवाही होईल. पोलिसांना हे खटले काढून टाकता येत नसल्याची माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली.
भाग पाच, भाग सहा
म्हणजे काय ?
भारतीय दंंडविधान संहिता कलमानुसार टोल समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये भाग पाचमध्ये ३९ गुन्ह्यांचा समावेश आहे. खून, दरोडा, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असतो. यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा असते. भाग सहामध्ये तीन वर्षांपेक्षा कमी व इतर भारतीय दंडविधान संहिता कलम असलेल्या गुन्ह्यांचा समावेश असतो. उदा. जुगार, हरणाचे कातडे पकडले आदी.