मलईदार पदासाठी बदलीपात्र सर्कल, तलाठ्यांची मोर्चेबांधणी; शासन आदेशानंतर बदली प्रक्रिया सुरू 

By भीमगोंड देसाई | Published: June 17, 2024 02:17 PM2024-06-17T14:17:45+5:302024-06-17T14:18:51+5:30

२५७ जणांच्या बदल्या होणार, लोकप्रतिनिधींकडून वशिला

257 people will be transferred in the revenue department of Kolhapur district, which is stalled due to Lok Sabha code of conduct | मलईदार पदासाठी बदलीपात्र सर्कल, तलाठ्यांची मोर्चेबांधणी; शासन आदेशानंतर बदली प्रक्रिया सुरू 

मलईदार पदासाठी बदलीपात्र सर्कल, तलाठ्यांची मोर्चेबांधणी; शासन आदेशानंतर बदली प्रक्रिया सुरू 

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : लोकसभा आचारसंहितेमुळे रखडलेल्या महसूल विभागातील पात्र असलेल्या २५७ जणांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये सर्कल, तलाठी शहरालगतच्या मलईदार पदावरच आपली बदली होण्यासाठी तर अव्वल कारकून, महसूल सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी, तहसील कार्यालयातील जमीन शाखा, आरटीएसमधील ( जमिनीसंबंधीच्या तक्रारी, दावे) क्रिम टेबल मिळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणूक लागणार असल्याने लोकप्रतिनिधीही आपल्याला हवा कर्मचारी हव्या त्या ठिकाणी राहण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्नशील आहेत. यामुळे बदल्यांनाही विशेष ‘भाव’ आला आहे.

प्रत्येक वर्षी महसूलमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के बदल्या केल्या जातात. एका पदावर तीन वर्षे आणि एका विभागात सहा वर्षे काम केलेले कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. प्रत्येक वर्षी ३१ मे पूर्वी बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. पण यंदा लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या रेंगाळल्या. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. यामुळे जिल्हा महसूलमधील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर बदलीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दरम्यान, बदलीपात्र कर्मचारी आपल्याला सोयीचे ठिकाण मिळावे, मलईदार पदावर वर्णी लागवी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच शहरालगत जमिनीच्या खरेदी, विक्री, बँक बोजा चढवणे, कमी करणे, एनए करणे, वर्ग बदलण्याची कामे अधिक होत असल्याने आणि याच कामातून मनसोक्त डल्ला मारता येत असल्याने अशा महसूल सज्जाला सर्वाधिक मागणी आहे. अशा मलईदार ठिकाणचे पद मिळण्यासाठी सर्कल, तलाठ्यांची रस्सीखेच सुरू आहे. काही जण तर थेट आमदार, खासदारांकरवी प्रयत्न करीत आहेत. परिणामी, यंदाच्या बदलीच्या प्रक्रियेसंबंधी कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

तलाठ्यांची पहिल्यांदाच जिल्ह्यात बदली होणार असल्याने..

पूर्वी तलाठ्यांच्या बदल्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच होत होत्या. आता पहिल्यांदाच जिल्ह्यात कोणत्याही सज्जावर बदली होणार आहे. यामुळे वशिलेबाजी, हप्तेखोरीमुळे लॉबिंग करून मलईदार परिसरातील सज्जावरच वर्षोनुवर्षे काम करणाऱ्यांनाही जिल्ह्यात इतर सज्जावर जावे लागणार आहे. त्यांंच्या महसूलमधील मक्तेदारीला सुरूंग लागणार आहे.

कोटींचा बंगलावाला तलाठ्याची बदली कोठे ?

प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच बदली झाल्याने चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील मलईदार सज्जावर तलाठी म्हणून काम केलेल्या कोटींचा बंगलावाला तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील तो तलाठी लॉबिंग करून प्रत्येक बदलीच्या प्रक्रियेत सर्वाधिक मलई असलेल्या ठिकाणीच वर्णी लावून घेतो. यंदा जिल्ह्यात कोठेही बदली होणार असल्याने त्या कोटींच्या बंगलेवाल्या तलाठ्याची कोठे बदली होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.

राजकीय पुढाऱ्यांची काही सर्कल, तलाठ्यांशी संगनमत

शेतकऱ्यासह विविध घटकाचा थेट संबंध तलाठी, सर्कलशी येतो. म्हणून आपल्या विरोधात जाणारा, आपल्यापेक्षा वरचढ ठरू पाहणाऱ्यांची हेलपाटे मारून जिरवण्यासाठी राजकीय पुढारी काही सर्कल, तलाठ्यांचा खांद्यावर बंदूक ठेवतात. म्हणून राजकीय पुढाऱ्यांचे संगनमत तलाठी, सर्कलशी असते, हे जगजाहीर आहे.

संवर्गनिहाय बदलीपात्र कर्मचारी असे :

  • तलाठी : १२०
  • सर्कल : २३
  • अव्वल कारकून : ४७
  • महसूल सहायक : ६७

Web Title: 257 people will be transferred in the revenue department of Kolhapur district, which is stalled due to Lok Sabha code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.