कोल्हापुरात गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 03:53 PM2022-03-18T15:53:25+5:302022-03-18T16:21:24+5:30
कोल्हापूर : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरात २५ ...
कोल्हापूर : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरात २५ लाख ८६ हजार ९२० रुपयाच्या गोवा बनावटीचा मद्यसाठासह एकूण ३० लाख ६७ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सद्दामहुसेन आदम मुल्ला (वय-३१ रा. कसबा सांगाव, ता. कागल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याकारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाला मोरेवाडी रोड येथील अक्षरधाम समता कॉलनीतील प्लॉट नंबर १६ मधील इमारतीत काही इसम बेकायदेशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा करुन कोल्हापूर शहर व परिसरात विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीवरुन उत्पादन शुल्कच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी या इमारतीच्या पहिल्या खोलीमध्ये तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या ट्रकमध्ये देखील मद्याचा साठा आढळून आला.
ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, सहायक निरीक्षण जगन्नाथ पाटील, अंकुश माने, मिलिंद गरुड, गिरीश करचे, विजय नाईक, नारायण रोटे, सचिन काळेल, बबन पाटील यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.