आजरा तालुक्यात २६ महिला बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:59+5:302021-01-09T04:19:59+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे तर तालुक्यातील २६ महिला बिनविरोध निवडून आल्या ...
आजरा : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे तर तालुक्यातील २६ महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्वसाधारण गटातून २०, अनुसूचित जातीमधून १ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून ५ महिलांना बिनविरोधमधून ग्रामपंचायत सदस्य होण्याची संधी मिळाली आहे. तालुक्यातील होनेवाडी, पेद्रेवाडी, गवसे, खोराटवाडी, एरंडोळ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर वाटंगी येथील ५ जागा बिनविरोध तर ४ जागांसाठी निवडणूक होत आहे. वाटंगीतील ५ पैकी ४ महिला बिनविरोध आहेत. एरंडोळ व खोराटवाडी ग्रामपंचायत बिनविरोध पण इतर मागास प्रवर्गातून महिलेची जागा जातीचा दाखला नसल्यामुळे रिक्त राहिली आहे. २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ७८ प्रभाग असून २०६ सदस्य निवडून द्यावयाचे असून १०३ महिलांना ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी मिळणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. पण, त्यापैकी ५० टक्के महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तालुक्यातून महिलांच्या ७७ जागांसाठी २१६ महिला रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटातील १५५ इतर मागास प्रवर्गातील ४७ तर अनुसूचित जाती गटातील १४ अशा महिला निवडणूक लढवत आहेत.
१५ जानेवारीच्या मतदानात त्या आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. २६ ग्रामपंचायतीच्या २०६ पैकी १६२ जागेसाठी निवडणूक होत आहे. ४२ जागांवर बिनविरोध तर २ जागा मागासचा दाखला नसल्यामुळे रिक्त राहिल्या आहेत. किणे, मलिग्रे, सुळे, कोवाडे, शिरसंगी, निंगुडगे, मुमेवाडी, चव्हाणवाडी, महागोंड, बेलेवाडी, देवर्डे याठिकाणी महिलांच्या प्रभागातील चुरशी रंगतदार होत आहेत. बेलेवाडीत सर्वांत जास्त म्हणजे १५ महिला रिंगणात आहेत तर सर्वांत कमी मुरूडे येथे ४ महिला निवडणूक लढवत आहेत.
----------------------------
* मतदानासाठी २१ गावांत ६२ मतदान केंद्र
ग्रामपंचायत मतदानासाठी २० गावात प्रत्येकी ३ अशी ६० तर वाटंगीत २ मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले असून निवडणुकीचे काम सुरळीत सुरू असल्याची माहिती तहसीलदार विकास अहिर व नायब तहसीलदार पी. बी. कोळी यांनी दिली.
----------------------------