मंडलिक कारखान्याचा २६७५ अंतिम दर
By admin | Published: September 21, 2015 12:23 AM2015-09-21T00:23:25+5:302015-09-21T00:32:35+5:30
संजय मंडलिक : राज्यात सर्वाधिक दराचा दावा; १७ कोटी शेतकऱ्यांना अदा
म्हाकवे : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाची देय शिल्लक ऊस बिले १७ कोटी १० लाख २९ हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. ही बिले २६७५ प्रमाणे अदा केली असून, हा ऊस दर राज्यामध्ये सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. मंडलिक म्हणाले, ‘कारखान्याने २०१४-१५ च्या गळीत हंगामात ५ लाख ४९ हजार ६७९ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.९४ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख १२ हजार ३७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
या हंगामात कारखान्याने २८ फेबु्रवारीअखेर गळितास आलेल्या उसास एफआरपी २६७५ रुपयांप्रमाणे ऊस बिले अदा केली होती. त्यानंतर कारखान्याने निधी उपलब्धतेनुसार १ ते १५ मार्च या कालावधीत रुपये १२०० प्र. मे. टन व १६ ते ३१ मार्च या कालावधीत ११०५ प्र. मे. टन प्रमाणे तसेच सोसायटी कर्जे थकीत जाऊ नयेत २६७५ रुपयाप्रमाणे अदा केले आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन कर्ज योजनेअंतर्गत कारखान्यास १७ कोटी १० लाख इतके प्राप्त झाले असून, एफआरपी प्रमाणे देय शिल्लक रक्कम १७ कोटी १० लाख २६ हजार संबंधित श्ोतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. तरी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले ऊस बिल घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे रक्कम देण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता रविवरी झाली. कारखान्याने येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ५ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, आनंदराव फराकटे, बापूसोा भोसले-पाटील, चंद्रकांत गवळी, शिवाजीराव इंगळे, बाबगोंडा पाटील, नंदकुमार घोरपडे, नंदाताई सातपुते, शिवानी भोसले, कामगार प्रतिनिधी संचालक सर्जेराव पाटील, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, तसेच विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)