कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे २७ उद्योग-व्यवसाय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:11+5:302021-04-20T04:26:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे शहर व परिसरातील २७ उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी भरारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे शहर व परिसरातील २७ उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी भरारी पथकाने दिले. शासन नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योजकांनी व्यवसाय बंदच ठेवावेत व कारवाई टाळावी, असे आवाहन पथकप्रमुख तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केले.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत उद्योग-व्यवसायालाही नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसारच उद्योग-व्यवसाय सुरु करता येणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा पथकांची नियुक्ती केली आहे. इचलकरंजी शहर व उद्योगांच्या तपासणीसाठी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे. या पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात विविध भागात पाहणी केली जात आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे.
पथकाने सोमवारी अचानक खंजिरे औद्योगिक वसाहत, इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट यासह अन्य उद्योग-व्यवसायांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी ६ उद्योग शासन निर्बंधांचे पालन करुन सुरु असल्याचे निदर्शनास आले, तर १७ उद्योग बंदच होते. तरीही याची खात्री पथकाने केली. यंत्रमाग, इंजिनिअरिंगसह अन्य २७ ठिकाणचे उद्योग शासन निर्बंधांचे उल्लंघन करुन सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनाला आले. हे उद्योग तातडीने बंद करण्याचे आदेश पथकाकडून देण्यात आले. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
चौकट
जिल्ह्यात आठ पथके नियुक्त
शासन निर्बंधांचे उल्लंघन करुन अत्यावश्यक सेवा वगळता सुरु राहणाऱ्या अन्य उद्योगांवर कारवाईसाठी जिल्ह्यात आठ पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये ११० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.