प्रादेशिक सेनेत २७ जागांची भरती
By admin | Published: February 18, 2015 11:40 PM2015-02-18T23:40:48+5:302015-02-18T23:42:55+5:30
२७ व २८ मार्चला भरती : १८ ते ४२ वयापर्यंतच्या उमेदवारांना संधी
कोल्हापूर : कोल्हापूर येथील मिलिटरी प्रशिक्षण मैदान येथे प्रादेशिक सेनेत शिपाईसह विविध २७ पदांसाठी निवड चाचणी मेळावा २७ व २८ मार्च रोजी सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये (जनरल ड्यूटी), लिपिक, सुतार, धोबी, शिंपी व स्वयंपाकी ही पदे आहेत. या मेळाव्यात १८ ते ४२ वयापर्यंतचे उमेदवार भाग घेऊ शकतात़ दोन्ही दिवशी सकाळी सात वाजता भरतीसाठी उमेदवारांनी हजर राहावे. सकाळी सातनंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाइट इन्फंट्री यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. प्रादेशिक सेनेमध्ये भरती झालेल्या जवानांना वर्षातून दोन महिने प्रशिक्षणासाठी बोलाविले जाते़ त्याच कालावधीचा मोबदला दिला जातो़ त्यानंतर आवश्यक वाटल्यास बोलावून देशाच्या कोणत्याही ठिकाणी सेवेसाठी पाठविले जाते़ सेवारत असलेल्या कालावधीकरिताच फक्त लागू असलेले वेतन व इतर भत्ते देण्यात येतील़ सेवारत नसलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भत्ते मिळणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी़ (प्रतिनिधी)
अशी आहेत पदे
पद : शिपाई, एकूण जागा : २१, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास (४५ टक्के गुण आवश्यक), राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडूंना प्राधान्य, टेक्निकल एज्युकेशन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
लिपिक : रिक्त जागा : ०२, शैक्षणिक पात्रता : बारावी पास, राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडंूना प्राधान्य. टंकलेखन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
धोबी : रिक्त जागा : ०१,
शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास.
स्वयंपाकी : रिक्त जागा : ०१,
शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास.
सुतार : रिक्त जागा : ०१, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास.
शारीरिक पात्रता
शिपाई, लिपिक, धोबी, स्वयंपाकी व सुतार या पदांकरिता शारीरिक पात्रता.
वय : १८ ते ४२ वर्षे
वजन : किमान ५० किलो
छाती : किमान ७७ सें. मी. व फुगवून ८२ सें. मी.
उंची : किमान १६० से.मी.
आवश्यक कागदपत्रे
भरतीवेळी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती व दोन झेरॉक्स प्रती आणाव्यात.
एस.एस.सी. व एच.एस.सी. प्रमाणपत्रे
एस.एस.सी. गुणपत्रिका
शाळा सोडल्याचा दाखला
सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडून वर्तणुकीचे प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे आठ फोटो
जातीविषयक प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना अतिरिक्त बोनस गुण दिले जातील; परंतु त्यासंदर्भात प्रमाणपत्र असणे गरजेचे.