गिरणीला वर्षाला २.७० कोटींची बचत
By admin | Published: August 9, 2015 11:48 PM2015-08-09T23:48:36+5:302015-08-09T23:48:36+5:30
खासगी वीज : आयकोस्पिन घेणार मित्तलची वीज
इचलकरंजी : बड्या उद्योगांना खासगी कंपन्यांकडून स्वस्त भावात वीज मिळू लागल्याने येथील सूतगिरण्यांनी खासगी कंपन्यांची वीज घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येथील आयकोस्पिन ही सूतगिरणी मित्तल पॉवर प्रोसेसर्स लि. या कंपनीकडून वीज घेणार असून, त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक २.७० कोटी रुपयांची बचत होणार आहे. याच धोरणाने आता इंदिरा महिला सहकारी सूतगिरणी व नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी या गिरण्याही वीज घेणार आहेत.
सहकारी सूतगिरण्यांना अधिकृतपणे घ्यावा लागणारा कापूस आणि सुताच्या उत्पादनावर द्यावा लागणारा कर यामुळे खासगी गिरण्यांपेक्षा सहकारी सूतगिरण्यांच्या सुताच्या उत्पादन खर्चात वाढ होते. त्याचबरोबर अलीकडील काळात कापूस व सुताच्या भावात असलेली अस्थिरता, यामुळे सहकारी सूतगिरण्यांना नुकसान सोसावे लागत असे. त्यातच दरवर्षी महाराष्ट्रातील विजेचे भाव वाढत आहेत. एकूण बाजारात असलेली सुताची किंमत व उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने सूतगिरण्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसू लागला. यावर उपाय म्हणून वीज निर्मितीचे (इलेक्ट्रिसीटी जनरेशन) उभारून पाहिले. मात्र, इंधनाच्या किमतीही प्रचंड वाढल्या आणि प्रकल्पांची वीजही महाग झाली.
अलीकडील काळात सरकारने खासगी वीज निर्मितीला प्राधान्य दिले आहे. काही खासगी कंपन्यांनी झारखंड, छत्तीसगड अशा आदिवासी क्षेत्र असलेल्या राज्यात वीज निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांना काही प्रमाणात करमाफी दिली असून, त्यांना अन्य प्रकारच्या सवलतीसुद्धा सरकारने दिल्या आहेत. साहजिकच अशा खासगी क्षेत्रातील प्रकल्पांची वीज स्वस्त भावात उपलब्ध झाली आहे.
खासगी कंपन्यांच्या प्रकल्पांची वीज ‘नॅशनल ग्रीड’ला दिली जाते. आवश्यकतेनुसार संबंधित राज्यात वीज घेण्यासाठी नॅशनल ग्रीडमधून स्टेट ग्रीडमध्ये घेतली जाते आणि मागणीप्रमाणे ही वीज मागणी करणाऱ्या उद्योगाला पुरविली जाते. त्यासाठी खासगी कंपनीकडून ‘त्या’ ग्रीडला वाहन भाडे दिले जाते. अशा प्रकारे आता ‘महावितरण’च्या वीज दरापेक्षा खासगी कंपन्यांच्या वीज दरामध्ये प्रतियुनिट सरासरी सव्वारुपयांची तफावत (म्हणजे सव्वारुपये स्वस्त) राहणार आहे. (प्रतिनिधी)
महिना २२.५ लाख रुपयांची बचत
सूतगिरण्यांना सध्या औद्योगिक दराने वीज पुरवली जाते. त्याचा ‘महावितरण’चा दर प्रतियुनिट आठ रुपये असणार आहे. जो जूनपासून दरवाढ होण्यापूर्वी सात रुपये २५ पैसे होता. आयकोस्पिनला आता ‘मित्तल’ कडून मिळणारी वीज पाच रुपये ७५ पैसे ते सहा रुपये प्रतियुनिट अशी मिळणार आहे. त्यामुळे ‘आयकोस्पिन’सारख्या सूतगिरणीला महिन्याला २२.५ लाख रुपयांची बचत अपेक्षित आहे.