कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवर राहणार २७० पथकांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:37 PM2024-04-02T13:37:33+5:302024-04-02T13:37:48+5:30

चित्रीकरण पुरावा म्हणून नोंदविले जाणार

270 teams are keeping an eye on the Lok Sabha elections in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवर राहणार २७० पथकांची नजर

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवर राहणार २७० पथकांची नजर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात ८५ भरारी पथके आणि ११९ स्थिर सर्वेक्षण अशा एकूण २७० पथकांची स्थापना करण्यात आली आहेत. 

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमलेले आहे. प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमलेले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. व्हिडिओ सर्वेक्षण पथकांची संख्या ४५ असून, २१ व्हिडिओ पाहणी पथके कार्यरत आहेत.

विविध प्रक्रियांचे चित्रीकरण

जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाअंतर्गत १० विधानसभा मतदारसंघात मिळून निवडणूक कालावधीत भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडिओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष हेदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

चित्रीकरण पुरावा म्हणून नोंदविले जाणार

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडिओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हीव्हीटीकडून केली जाते. हे चित्रीकरण पुरावा म्हणून नोंदविले जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व्हीएसटी आणि व्हीव्हीटी नेमल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात.

एकूण २७० पथकांची नियुक्ती

  • भरारी पथक (एफएसटी) : ८५
  • स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) : ११९
  • व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी) :४५
  • व्हिडिओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) :२१
  • पथकांना एक दिवसाचे प्रशिक्षण


या विविध पथकांना जिल्हास्तरावर ९ मार्चला एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १२ एप्रिलपासून या विविध पथकांचे खरे काम सुरू होईल.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही ही कामे करण्यात येतात. - समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर.

Web Title: 270 teams are keeping an eye on the Lok Sabha elections in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.