कलाकार मानधनासाठी ‘बोगस’ कागदपत्रांचे जोडकाम, कोल्हापूर जिल्ह्यातील किती जण ठरले अपात्र.. वाचा

By समीर देशपांडे | Updated: April 19, 2025 13:01 IST2025-04-19T13:01:37+5:302025-04-19T13:01:48+5:30

समीर देशपांडे कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेेसाठी अनेकांनी बोगस कागदपत्रे जोडल्याचे ...

271 people from Kolhapur district who submitted bogus documents for artist honorarium were disqualified | कलाकार मानधनासाठी ‘बोगस’ कागदपत्रांचे जोडकाम, कोल्हापूर जिल्ह्यातील किती जण ठरले अपात्र.. वाचा

कलाकार मानधनासाठी ‘बोगस’ कागदपत्रांचे जोडकाम, कोल्हापूर जिल्ह्यातील किती जण ठरले अपात्र.. वाचा

समीर देशपांडे

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेेसाठी अनेकांनी बोगस कागदपत्रे जोडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पहिल्याच झटक्यात जिल्ह्यातील ११ तालुक्यातील २७१ जण अपात्र ठरले आहेत. उर्वरित सर्वांचे सादरीकरण गेले तीन दिवस कागलकर हाऊसमध्ये घेण्यात आले.

गेल्या वर्षीपासून या योजनेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. आधीच्या योजनेत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक अशी वर्गवारी करून त्यांना साडेतीन हजारांपासून दोन हजारांपर्यंत मानधन दिले जात असे. परंतुु आता ही वर्गवारी रद्द करण्यात आली असून सरसकट महिना ५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील अनेकांसाठी ही दिलासादायक रक्कम असल्याने अनेकांनी कोणत्याही परिस्थितीत हे मानधन मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातूनच काहींनी राष्ट्रीय, राज्य पातळीवर संस्थांची कार्यक्रमात सहभागी झाल्याची प्रमाणपत्रे गोळा केली असून यामध्ये एकाच्या नावावर कागद ठेवून त्याची झेरॉक्स करून त्यावर आपले नाव लिहून झेरॉक्स काढून जोडल्याचे आढळून आले आहे.

संबंधित कलाकाराचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांच्या आतील पाहिजे, असा दाखला आवश्यक असून याबाबतही अनेकांनी बोगसपणा केला आहे. वास्तविक कोणाला हे मानधन द्यावे याची टक्केवारीनुसार शासन आदेशात स्पष्टता करण्यात आली आहे. लोककला, चित्रपट नाट्य कलाकार, प्रयोगात्मक कलाप्रकार, साहित्यिक अशीही वर्गवारी करण्यात आली असून वार्षिक १०० कलाकारांची निवड करावयाचे बंधन निवड समितीवर आहे.

अन्य कोणत्याही योजनेतून निधी असल्यास अपात्र

नमो किसान योजना, पीएम किसान योजना, लाडकी बहीण यासारख्या कोणत्याही योजनेतून निवृत्तीवेतन किंवा मासिक मानधनाच्या योजनेतून संबंधित मानधन घेत असेल तर अशांना या योजनेतून मानधन मिळणार नाही.

जिल्ह्यातील स्थिती

  • एकूण ऑनलाइन आलेले अर्ज - ६६६
  • सादरीकरणासाठी पात्र - ३९५
  • राधानगरी - १८४
  • करवीर - ६८
  • हातकणंगले - ३०
  • भुदरगड - ३०
  • कागल - २७
  • पन्हाळा - २०
  • गडहिंग्लज - १२
  • शिरोळ - ०७
  • शाहूवाडी - ०७
  • आजरा - ०६
  • चंदगड - ०६
  • गगनबावडा - ००


अन्य महत्त्वाचे निकष

  • वय ५० पेक्षा अधिक असावे. दिव्यांगासाठी १० वर्षे सूट
  • कलाकारांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान १५ वर्षे असावे.
  • ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे.
  • वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहिल.
  • जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून असून त्यांना अन्य कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र ठरतील.

Web Title: 271 people from Kolhapur district who submitted bogus documents for artist honorarium were disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.