‘चेंबर आॅफ कॉमर्स’ंसाठी २८ जण रिंगणात
By admin | Published: December 28, 2016 12:11 AM2016-12-28T00:11:56+5:302016-12-28T00:11:56+5:30
तीन जागा बिनविरोध : दिलीप मोहिते, ललित गांधी, महेश धर्माधिकारी यांची निवड
कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात तीन गटांतील २० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात १७ विद्यमान संचालकांचा समावेश आहे. सह व मानद सभासद गटापाठोपाठ कॉर्पोरेट सभासद गटातील बिनविरोध निवडीमध्ये सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली. अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर मंगळवारी हे चित्र स्पष्ट झाले. ‘चेंबर’साठी आता सत्ताधारी विरोधात व्यापार, उद्योजक परिवर्तन क्रांती आघाडी यांच्यात लढत होणार आहे.
या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळातील २३ जागांच्या निवडीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाली. यासाठी ५८ जणांचे अर्ज पात्र ठरले. मंगळवार हा अर्ज माघारीच्या मुदतीमधील शेवटचा दिवस होता. यावेळी एकूण २५ जणांनी माघार घेतली. कॉर्पोरेट सभासद गटातील दोन जागांसाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यातील रेश्मा पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने विद्यमान संचालक दिलीप मोहिते व ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. संलग्न सभासद गटातील पाच जागांसाठी आठ अर्ज दाखल झाले होते. यातील कमलेश कात्रे, सुरेश गायकवाड यांनी माघार घेतली. साधारण सभासदांपैकी औद्योगिक संस्था गटामधील पाच जागांसाठी १४ दाखल केले होते. यातील राजीव परीख, रघुनाथ थोरात, रमेश लालवाणी, सुनील काळे, संभाजीराव पोवार, डी. डी. पाटील, प्रकाश मालाडकर, सागर लाड यांनी माघार घेतली. व्यापारी संस्था गटातील १० जागांसाठी ३० जणांकडून अर्ज दाखल झाले होते. यामधील विनोद डुणुंग, सीमा शहा, हितेंद्र पटेल, राजेंद्र शेटे, नितीन धूत, संजीव चिपळूणकर, अजित होनोले, सुजित चव्हाण, विनोद पटेल, अरुण हत्ती, उदयसिंह निंबाळकर, अतुल शहा, लक्ष्मणप्रसाद चौधरी, सुधीर खराडे यांनी अर्ज मागे घेतले. चिन्ह वाटपाची प्रक्रिया आज, बुधवारी सायंकाळी होईल. यानंतर दि. ४ जानेवारीला मतदान होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. दीपक देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यापासून अर्ज माघारीच्या अखेरच्या मुदतीपर्यंत ती बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, काही उमेदवार लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर निवडणूक लागली आहे. (प्रतिनिधी)
रिंगणातील उमेदवार...
संलग्न सभासद गट : आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, संजय शेटे, धनंजय दुग्गे (विद्यमान संचालक), प्रकाश पुणेकर.
औद्योगिक संस्था गट : विजय मेनन, सुरेंद्र जैन, दिनेश बुधले (विद्यमान संचालक), योगेश कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, सुरेश भिवटे.
व्यापारी संस्था गट : जयेश ओसवाल, दीपक मिरजे, भरत ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रकाश केसरकर, शिवराज जगदाळे, नयन प्रसादे, हरिभाई पटेल, संजयकुमार पाटील (विद्यमान संचालक), बाहुबली पाटील, गिरीश कर्नावट, जयंतकुमार गोयाणी, पारस ओसवाल, राहुल नष्टे, मनोहर ढवळे, संदीप अथणे.