कोल्हापूर जिल्ह्यातील २८९ बेवारस वाहनांचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:00 PM2018-12-24T13:00:45+5:302018-12-24T13:04:12+5:30

गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

289 unemployed vehicles in Kolhapur district will be auctioned | कोल्हापूर जिल्ह्यातील २८९ बेवारस वाहनांचा होणार लिलाव

कोल्हापुरातील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस स्थितीत पडून असलेली वाहने. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २८९ बेवारस वाहनांचा होणार लिलावपोलीस प्रशासनाचा जाहीरनामा : मूळ मालकांना दोन महिन्यांची मुदत

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत ही वाहने मूळ मालकांनी मालकी हक्काचे हितसंबंध, वारसा, तारण, विमा हक्क याबाबतचे मूळ दस्तऐवज दाखवून घेऊन जावी. त्यानंतर या सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोटिसीद्वारे जाहीर केले आहे.

चोरी, अपघात किंवा अन्य गुन्ह्यांत हस्तगत केलेल्या दुचाकी संबंधित पोलीस ठाण्याच्या आवारात लावून ठेवली आहेत. न्यायालयीन प्रक्रियेच्या झंझटीमुळे अनेकांनी वाहने सोडवून घेण्याची तसदीच दाखविलेली नाही. अपघातातील वाहने पुन्हा घरी नको, ती पोलीस ठाण्यातच सडून राहू दे, अशा मानसिकतेखाली अनेक अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्याच्या दारात अनेकवर्षे पडून आहेत.

उन्हाळा, पावसाळ्यात ती उघड्यावरच पडल्याने सडून, गंजून गेली आहेत. जिल्ह्यातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर, कागल, मुरगूड, गांधीनगर, शिरोली एम. आय. डी. सी. गोकुळ शिरगाव, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, शिवाजीनगर, गावभाग इचलकरंजी, कुरुंदवाड, हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, वडगाव, भुदरगड, आजरा, नेसरी, गडहिंग्लज, चंदगड, आदी २६ पोलीस ठाण्यांच्या दारात गुन्ह्यांतील वाहनांचा ढिग साचल्याने पोलीस ठाण्यांचा श्वास कोंडत होता.

पावसाचे पाणी या गाड्यांमध्ये साचून राहिल्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजाराचा सामना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. चांगली वाहने अनेकवर्ष पडून राहिल्याने ती सडून, गंजून निकामी झाली आहेत. त्यांना वापरात आणता येणार नाही, अशी बिकट अवस्था बहुतांशी वाहनांची झाली आहे. मालक असूनही अपुऱ्या कागदपत्रामुळे ती घरी घेऊन जाता आलेली नाहीत, तर अनेक वाहनांचे मालकच नाहीत, आदी कारणांमुळे ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात सडत पडली आहेत.

सुमारे २७७ दुचाकी, तीनचाकी ६, चारचाकी ६, अशा सुमारे २८९ वाहनांचा अखेर लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांची मंजुरी घेऊन रविवारी प्रशासनाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत सर्वोतोपरी प्रयत्न करून बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता, संबंधित वाहनांचे मालक मिळून आलेले नाहीत.

फक्त सांगाडेच

पोलीस ठाण्याच्या आवारात सडत असलेल्या बहुतांशी वाहनांचे सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. चांगले पार्ट चोरीला गेले आहेत. ते कोणी नेले, पोलीस ठाण्याच्या दारातून पार्टची चोरी होते, हा संशयाचाच प्रकार आहे. अगदी दुचाकीच्या बॅटऱ्या, इंजिन, टायर यांचा समावेश आहे.

वाहनांच्या मालकी हक्कांबाबत कोणीही पोलीस ठाण्यांशी संपर्क केलेला नाही; त्यामुळे ही वाहने पोलीस ठाण्याच्या दारात अनेक वर्षे बेवारस स्थितीत पडून असल्याने, ती गंजून खराब होत असल्याने त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मला अधिकार असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा १९५१ कलम ८५ प्रमाणे बेवारस वाहनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

 

जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेल्या वाहनांबाबत आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देऊन आपले वाहन घेऊन जावे. ६0 दिवसांनी संबंधित वाहनांवर आपला हक्क सांगता येणार नाही. या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
डॉ. अभिनव देशमुख,
पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

 


१) जिल्ह्यातील २६ पोलीस ठाण्यांच्या आवारातील वाहनांचा लिलाव
२) दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा समावेश
३) वाहने घेऊन जाण्यासाठी मूळ मालकांना ६0 दिवसांची मुदत
४) अनेक वाहनांचे मालकच नाहीत
५) पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांच्या कोंडीमुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात


 

 

Web Title: 289 unemployed vehicles in Kolhapur district will be auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.