वाळव्यातील टोळीकडून २९ दुचाकी जप्त

By admin | Published: September 14, 2014 10:56 PM2014-09-14T22:56:48+5:302014-09-14T23:54:57+5:30

तिघांना अटक : सांगली, इस्लामपूर, कऱ्हाड, कोल्हापुरातील गुन्हे उघडकीस; सूत्रधारावर गंभीर गुन्हे

29 trucks seized from the desert tribe | वाळव्यातील टोळीकडून २९ दुचाकी जप्त

वाळव्यातील टोळीकडून २९ दुचाकी जप्त

Next

सांगली : वाळवा येथून दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या टोळीकडून चोरीतील २९ दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आज (रविवार) यश आले. त्यांची किंमत ११ लाख ६० हजार रुपये आहे. टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सांगली, इस्लामपूर, कऱ्हाड व कोल्हापुरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांमध्ये टोळीचा मुख्य सूत्रधार विवेक ऊर्फ पप्पू मानसिंग काळे (वय २४, रा. माळभाग, वाळवा), मनोज पांडुरंग यादव (२०, श्रमिकनगर वसाहत, वाळवा) व अर्जुन प्रकाश वाझे (२४, बोरगाव, ता. वाळवा) यांचा समावेश आहे.
काळे हा दुचाकी चोरीचे गुन्हे करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. त्याला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, त्याने गेल्या सहा महिन्यात सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे येथून २९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या यादव व वाझे या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. दारुची दुकाने व परमिट रुम बिअरबारसमोरील दुचाकी त्यांनी चोरल्या आहेत. या दुचाकींचा क्रमांक बदलून त्या तीन ते चार हजारात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. काळेसह तिघांची सावंत यांनी कसून चौकशी केली. ते दुचाकी कशी चोरत होते, याचे प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून करुन घेतले.
पोलीसप्रमुख सावंत म्हणाले, संशयित काळे हा २००८ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. तो मूळचा तळबीड (ता. कऱ्हाड) येथील आहे. चोरलेल्या दुचाकींचा क्रमांक बदलून देण्यासाठी त्याला चार ते पाच पेंटरनी मदत केली आहे. या पेंटरची नावे निष्पन्न करुन त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला जाणार आहे. जप्त केलेल्या २९ दुचाकीतील केवळ सात दुचाकींचे मालक मिळाले आहेत. उर्वरित २२ दुचाकींच्या मालकांचा इंजिन व चेस क्रमांकावरुन शोध घेतला जात आहे. ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत, त्यांनी गुन्हे अन्वेषणशी संपर्क साधावा. काळे व यादव दुचाकी चोरायचे व ग्राहक शोधून ती विक्री करण्याची जबाबदारी वाझेवर असायची.
निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक फौजदार एम. डी. पाटील, हेड कॉन्स्टेबल अशोक डगळे, शंकर पाटील, संदीप मोरे, विशाल भिसे, कुलदीप कांबळे, उदय माळी, अझर पिरजादे, चेतन महाजन, अभिजित गायकवाड, सागर लवटे, इस्लामपूर ठाण्यातील अवधुत इंगवले, चालक काबुगडे, सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, चोरट्यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर व सातारा पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधला आहे. (प्रतिनिधी)

काळेकडून गुन्ह्यांची मालिकाच
सावंत म्हणाले, काळे हा २००८ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. २००९ मध्ये त्याने वाळव्यातील विक्रम सुभाष पाटील (वय २२) या तरुणाचा खून केला होता. या खुनातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. तेव्हापासून तो गुन्हेगारीत अधिकच सक्रिय झाला. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात चोरीचे गुन्हे करताना त्याचे कोण साथीदार होते का? याची चौकशी केली जात आहे. त्याच्यासह तिघांना उद्या (सोमवार) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील का, त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.

Web Title: 29 trucks seized from the desert tribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.