जिल्ह्यातून ७३ गुन्हेगार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:40 AM2019-10-01T11:40:11+5:302019-10-01T11:43:17+5:30
विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्यातील उपद्व्यापी व रेकॉर्डवरील ७३ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. तसेच ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे शपथपत्र स्टॅम्पवर लिहून घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्यातील उपद्व्यापी व रेकॉर्डवरील ७३ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. तसेच ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे शपथपत्र स्टॅम्पवर लिहून घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
निवडणुकीत मतदारांवर दबाव टाकणे, पैशांचे वाटप करणे, अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे, बोगस मतदान करणे, असे गैरप्रकार गुन्हेगारांकडून होऊ शकतात. त्याला चाप लावण्यासाठी उपद्व्यापी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. कलम १०७ प्रमाणे २३१, तर कलम ११० प्रमाणे ९४ अशा एकूण ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांसह ७३ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले. यामध्ये राजारामपुरीतील बबन लाला कवाळे (वय ५०, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) याच्यासह पाचजणांचा समावेश आहे.
याशिवाय शिंगणापूर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गागडे टोळीचा प्रमुख योगेश उर्फ गोपी राजेश गागडे (२२, रा. गणेश नगर, शिंगणापूर), रियाज नवी तांबोळी (२०, रा. शिंगणापूर) आणि सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर (२४, रा. कसबा बावडा) यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही टोळ्या एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्या आहेत. झोपडपट्टी गुंडा कायद्याखाली सहा गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
- प्रतिबंधात्मक कारवाया - ३२५
- हद्दपार गुन्हेगार - ७३
- हद्दपार टोळ्या - २