कोल्हापूरची दानत..मुलींसाठी उभारले पावणेतीन कोटींचे वसतीगृह 

By विश्वास पाटील | Published: December 20, 2023 02:03 PM2023-12-20T14:03:31+5:302023-12-20T14:03:43+5:30

प्रा. तिलोत्तमा नेवगी महिला वसतीगृह नामकरण सोहळा शनिवारी

3 Crore hostel for girls set up in Kolhapur, Prof. Tilottama Newgi Women's Hostel Naming Ceremony on Saturday | कोल्हापूरची दानत..मुलींसाठी उभारले पावणेतीन कोटींचे वसतीगृह 

कोल्हापूरची दानत..मुलींसाठी उभारले पावणेतीन कोटींचे वसतीगृह 

कोल्हापूर : समाजाच्या हिताचे काम होत असेल तर कोल्हापूरचा माणूस त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो याचा अनुभव पुन्हा एकदा बालकल्याण संकुलला आला आहे.. बालकल्याण संकुल च्या वतीने लोकाश्रयातून दोन कोटी 80 लाख रुपयांचा निधी उभारून मुलींची वस्तीगृह बांधण्यात आले आहे .

या ताराराणी चौकातील महिला वसतीगृहाचे प्रा. तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी असे नामकरण व उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता होत आहे. रेणूका शुगर्सच्या संस्थापक अध्यक्ष विद्या मुरकुंबी, जिल्हाधिकारी  राहूल रेखावार  व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी, कैलाश नेवगी व सर्व कुटुंबीय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. या वसतिगृहात ४८ महिलांची राहण्याची उत्तम सोय केली आहे.

कोल्हापुरातील प्रसिध्द विधिज्ञ अँड. अभय नेवगी यांचे संस्थेशी बरीच वर्ष ऋणानुबंध आहेत. संस्थेच्या मदतीच्या हाकेला ते कायम धावून आले आहेत. संस्थेच्या कोणत्याही न्यायालयीन कामात एक नया पैसाही न घेता ते कित्येक वर्षे मदत करत आले आहेत. संस्थेला या इमारतीसाठी निधीची अडचण असल्याचे समजल्यावर त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला आणि ५० लाख रुपयांचा निधी संस्थेकडे सुपूर्द केला. त्यांच्या या मदतीचे ऋण म्हणून संस्थेने या वसतिगृहाला ॲड नेवगी यांच्या मातोश्री प्रा. तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी यांचे नांव देण्याचा निर्णय घेतला. वसतिगृहाला योग्य व्यक्तीचे नाव दिल्याचा संस्थेला मनस्वी आनंद होत आहे.

संस्थेने या जागेवर महिला वसतीगृह बांधण्याचा निर्णय २०१८ ला घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी व संस्थाध्यक्ष दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाने विश्वस्त  व्ही. बी. पाटील, वास्तुविशारद निरंजन वायचळ  सुरेश शिपूरकर व सर्व विश्वस्त यांच्या मदतीने सचिव पद्मजा तिवले आणि सहसचिव एस.एन. पाटील यांनी प्लॅन मंजुरी व इतर सोपस्कार यशस्वी केले. कोल्हापूरात १९३७ साली स्थापन झालेल्या मूळ अनाथ महिला आश्रमाचे विलीनीकरण १९९१ साली बालकल्याण संकुल या संस्थेत झाले. या महिलाश्रमाची सुमारे १० हजार चौरस फूट जागा संस्थेकडे आली. या जागेवरील असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी संस्थेने उच्च न्यायालयापर्यंत लढाई केली.

यांचे योगदान मोलाचे..

संस्था उभारण्याचा संकल्प झाल्याबरोबर संस्थेबद्दल आस्था असणाऱ्या श्री ब्रीहद भारतीय समाज मुंबई, लक्ष्मी सिव्हिल इंजि.प्रा.लि कोल्हापूर, मा. टी.डी.कुलकर्णी, डॉ. सुभाष आठले, संस्थेचे उपाध्यक्ष मा.सुरेश शिपूरकर, कॅप्टन उत्तम पाटील, अध्यक्ष शेतकरी सहकारी संघ, ह्युमन इक्विटी अँड डीग्निटी फंडचे शिरीष बेरी,  कन्स्ट्रक्शनचे सहसचिव एस.एन.पाटील, सचिन भानुशाली कोल्हापूर यांच्याकडून भरीव अर्थसहाय्य प्राप्त झाले.

लोकाश्रयातून देखणी वास्तू..

युनिक ऑटोचे चोरडिया समूहाने इमारत बांधणीसाठी बिनव्याजी डिपॉझिट देऊन बांधकामात सहकार्य केले. अशा विविध दानशूर व्यक्तींकडून भरीव अर्थसहाय्य प्राप्त झाल्यामुळेच २ कोटी ८० लाखाची ही अत्यंत देखणी वास्तू कोणत्याही शासकीय मदतीशिवाय उभी राहू शकली याचा संस्थेला नक्कीच अभिमान वाटतो.

उत्तम सोयी-सुविधा..

हे नवीन वसतीगृह व्यवसाय, नोकरी करणाऱ्या एकल महिलांच्या निवासासाठी बांधले असून प्रसंगी गरजू व उच्च शिक्षण घेणाऱ्या बालकल्याण संकुलच्या निराधार विद्यार्थीनीनांही तेथे राहता येईल. या वसतीगृहात ४८ महिलांची राहण्याची उत्तम सोय असून येथे सोलर वॉटर हिटर योजना, पुरेशी वीज, पाणी आणि उत्तम फर्निचर इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्या महिलांना स्वत:च्या कुटुंबात राहतोय असे वाटावे इतक्या चांगल्या सोयी तिथे दिल्या आहेत.

Web Title: 3 Crore hostel for girls set up in Kolhapur, Prof. Tilottama Newgi Women's Hostel Naming Ceremony on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.