स्वस्त घरांसाठी २५० कोटींची गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:23 AM2019-09-19T00:23:14+5:302019-09-19T00:23:18+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विविध ठिकाणी होणाऱ्या सात प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात दोन हजार परवडणारी ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विविध ठिकाणी होणाऱ्या सात प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात दोन हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. त्यात महानगरपालिकेचा एक आणि खासगी विकसकांचे सहा प्रकल्प आहेत; त्यासाठी सुमारे २५० कोटींची गुंतवणूक होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) परवडणाºया घरांसाठी एक टक्का वस्तू व सेवाकर (जीएसटी), एक हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी, सेस आणि नोंदणी शुल्क प्रत्येकी एक टक्का, अडीच लाखांचे अनुदान अशा सवलती आहेत; त्यामुळे खासगी नोकरदार, रिक्षा व्यावसायिक, भाजी विक्रेते, छोटे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांसह मध्यमवर्गीय कुटुंबे, त्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी उत्सुक आहेत. ते लक्षात घेऊन विकसक, बांधकाम व्यावसायिकांनी परवडणारी घरे साकारणाºया प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क, कदमवाडी, पुईखडी, आपटेनगर या ठिकाणी प्रत्येकी एक आणि कसबा बावडा परिसरात दोन खासगी प्रकल्प, तर आपटेनगर ते साळोखेनगरदरम्यान असलेल्या श्रीराम कॉलनीलगतच्या रि. स. नं. १००९ / अ येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या दोन एकर जागेत २३४ घरांचा एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातील ४५० चौरस फुटांच्या वन बीएचके सदनिकेची किंमत साधारण ११ लाख २० हजार आहे. अडीच लाखांचे अनुदान वगळता एक सदनिका आठ लाख ७० हजार रुपयांना लाभार्थ्यांना मिळेल.
नागाळा पार्क आणि पुईखडी परिसरातील प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. अन्य प्रकल्पांची काही परवानगीची कामे सुरू आहेत. महानगरपालिकेच्या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. खासगी प्रकल्पांमध्ये २00 जणांनी नोंदणी केली आहे. महापुरामुळे बांधकाम क्षेत्रातील थोडी थांबलेली हालचाल पुन्हा सुरू झाली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गृहस्वप्न साकारण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून पुन्हा प्रकल्पांची माहिती घेण्यात येत आहे.
कोल्हापूरमध्ये चांगले मार्केट : कोल्हापूरमध्ये परवडणाºया घरांसाठी चांगले मार्केट आहे. ४६ हजार घरांची गरज आहे. सध्या सात प्रकल्पांतर्गत दोन हजार घरे साकारणार आहेत. घरांची गरज लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिक, विकसकांनी काम सुरू केले आहे; मात्र त्याला शासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. परवडणारी घरे साकारतांना बांधकाम परवाना कमी वेळेत मिळण्याची यंत्रणा शासनाने उभारावी. महानगरपालिकेने स्वतंत्र कक्ष सुुरू करावा, अशी मागणी ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी केली. विविध सवलती, कर्जपुरवठ्याबाबत बँका सकारात्मक असल्याने ग्राहकांना त्यांचे गृहस्वप्न साकारण्याची सध्या चांगली संधी आहे. महानगरपालिकेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव ‘क्रिडाई कोल्हापूर’कडे आला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे बेडेकर यांनी सांगितले.
महानगरपालिकेचा ३६८४ घरांचा प्रस्ताव
परवडणाºया घरांसाठी महानगरपालिकेकडे १९,७४४ नागरिकांचे प्रस्ताव, अर्ज दाखल झाले. त्यापैकी ३६८४ प्रस्ताव मंजूर केले. त्यात वैयक्तिक घरबांधणी ४५० तर, खासगी भागीदारीतून विविध तीन प्रकल्पांद्वारे ३२३४ इतकी घरबांधणी करण्याचा प्रस्ताव आहे. पहिला प्रकल्प २३४, दुसरा १२०० आणि तिसरा १८०० घरांचा असल्याचे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यकारी अभियंता सुधीर माने यांनी सांगितले. आपटेनगर ते साळोखेनगर परिसरातील २३४ घरांच्या प्रकल्पासाठी तीनवेळा निविदा प्रसिद्ध केली; पण त्याला विकसकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. आता त्याबाबत ‘क्रिडाई कोल्हापूर’ समवेत चर्चा सुरू आहे. संभाजीनगर परिसरातील कामगार चाळ आणि ताराराणी चौकातील पालिकेच्या जागेवर परवडणाºया घरांचा प्रकल्पासाठी आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे.