कोल्हापूरकरांनो सावधान!, तीन दिवसांत आढळले ३० कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:12 PM2023-03-27T13:12:47+5:302023-03-27T13:13:04+5:30
रुग्णसंख्या वाढल्यामुळे प्रशासनावर चिंतेचे सावट
कोल्हापूर : कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या तीन दिवसांत एकूण ३० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संसर्ग संपला, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडत असतानाच ही रुग्णसंख्या वाढल्यामुळे प्रशासनावर चिंतेचे सावट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी आठ, शनिवारी दहा, तर रविवारी कोरोनाचे बारा रुग्ण आढळून आले. मध्यंतरी कोराना रुग्णांची संख्या शून्यावर आली होती; परंतु अलीकडे ही संख्या हळूहळू वाढायला लागली आहे. गेल्या तीन दिवसांतील आकडेवारी पाहता आरोग्य प्रशासनाचेही डोळे विस्फारले आहेत. कोरोना संसर्गाचे दुष्परिणाम फारसे दिसत नसल्यामुळे नागरिकांतही त्याबाबतची भीती कमी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी
देशातील कोरोना व्हायरस आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केली आहे. या एडव्हायझरीमध्ये लोकांना कोरोनासाठी निश्चित केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या आणि बंद ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.