तीस कोटीचा प्रकल्प ४५७ कोटींवर-आंबेओहळ प्रकल्प : फक्त कागदावर १५ टक्के काम शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:36 PM2018-11-09T22:36:28+5:302018-11-09T22:38:38+5:30
सन १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २० वर्षे होऊनही या प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम रखडले आहे.
रवींद्र येसादे ।
उत्तूर : सन १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २० वर्षे होऊनही या प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम रखडले आहे. कागदावर १५ टक्के काम शिल्लक असले तरी प्रत्यक्षात मात्र काम भरपूर आहे. ३० कोटींचा प्रकल्प सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह तो ४५७ कोटींवर पोहोचला आहे. आतातरी आंबेओहळ लाभधारक व विस्थापितांचे ग्रहण सुटणार का? असा प्रश्न विस्थापितांना पडला आहे.
१.२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा असणाऱ्या प्रकल्पात आजरा तालुक्यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २२७ कोटी ५४ लाख रुपयांत स्वेच्छा पुर्नवसन, गावठाण वसाहतींचे प्रश्न, नागरी सुविधा, जमिनींचे वाटप आदी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे एकही वीस वर्षांत बांधला नाही. तो पूर्ण होणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सन २०१९ मध्ये पाणीसाठा होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात निधीचे वाटप झाल्यानंतरच काम सुरू होणार आहे.
बाबा, मुश्रीफ अन् दादा..!
स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांनी प्रकल्पाचे काम सुरू केले. बाबांनी पुनर्वसन व प्रकल्पाचे काम ५० टक्क्यांपर्यंत नेले. आमदार हसन मुश्रीफ यांनी काम पुढे नेले. आता प्रकल्प पूर्ण करण्याचे जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर असणार आहे.
शासन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देत सुटले आहे. आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळून वर्ष उलटले तरी एका रुपयाचा निधी नाही. आंबेओहळ प्रकल्पाची अवस्था होऊ नये, प्रत्यक्षात पैसे येतील तेव्हाच खरे.
- कॉ. संपत देसाई, राज्य संघटक श्रमिक मुक्ती दल