जिल्ह्यातील ३० टक्के मृत्यू शेवटच्या २४ तासातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:25+5:302021-04-28T04:26:25+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात मृत्यूदर वाढल्याने डेथ ऑडिट करण्यात येत असून ३० टक्के मृत्यू हे शेवटच्या २४ तासातील आहे. दवाखान्यात ...
कोल्हापूर : जिल्ह्यात मृत्यूदर वाढल्याने डेथ ऑडिट करण्यात येत असून ३० टक्के मृत्यू हे शेवटच्या २४ तासातील आहे. दवाखान्यात न जाता घरातल्या घरात केलेल्या उपचारांचा हा परिणाम आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच तातडीने आरटीपीसीआर केल्यास मृत्युदर कमी करता येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही मृत्युदर रोखण्यासाठी सर्वाधिक प्राधान्याने प्रयत्न व्हावेत, अशा सक्त सूचना जिल्हा व आरोग्य प्रशासनास दिल्या.
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, डॉ. फारुक देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात सात ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट सुरू करण्यात येत असून त्याची निविदाही काढण्यात आली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात ४०० च्या वर ऑक्सिजन बेड्स आहेत, बेड्सची माहिती मिळण्यासाठी डॅश बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यावर शासकीय व खासगी सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सची माहिती मिळेल. गृह विलगीकरणातील रुग्णांवरील उपचारांचे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून योग्यरितीने निरीक्षण केले जात आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन व रेमडेसिविर उपलब्ध होण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे व प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. मृत्युदर रोखण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत.
८५०० बेड्सची क्षमता
कोविड रुग्णांवरील उपचारासाठी अद्याप सामाजिक संस्थांचा सहभाग घेतलेला नाही. यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आधी शासकीय यंत्रणेकडील सर्व कोविड केंद्रांमधील बेड्स पूर्ण क्षमतेने वापरले जात आहेत. आपल्या एकूण बेड्सची क्षमता ८५०० इतकी आहे. डीओटी येथील केंद्रात अनेक बेड्स रिकामे आहेत. ते भरले की शिवाजी विद्यापीठ, संजय घोडावत अशा टप्प्या-टप्प्यांनी कोविड केअर केंद्रांची संख्या वाढवली जाईल.
---
लसीकरणाबाबत आज निर्णय
मंत्री मुश्रीफ म्हणाले, १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अजून स्पष्टता नाही. आज, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असून त्यानंतर नियोजन केले जाईल. सध्या लसीचा तुटवडा असला तरी आता ग्लोबल टेंडर काढण्यात येणार असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या स्पुटनिक, फायझर अशा सगळ्या प्रकारच्या लसींची खरेदी केली जाणार आहे.
--
ऑनलाईन नोंदणीच हवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू होत असून जागेवर नोंदणी केली जाणार नाही. तरी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणीनंतर आलेल्या मेसेजनुसार दिलेल्या तारखेला लस घेण्यासाठी यावे.
फोटो नं २७०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ :
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--