मिरजेत कॅशव्हॅनमधून ३० लाख लंपास

By admin | Published: February 9, 2017 12:18 AM2017-02-09T00:18:15+5:302017-02-09T00:18:15+5:30

भरदिवसा चौघा चोरट्यांचे कृत्य : जीपची काच फोडून रक्कम पळविली; पाळत ठेवून मारला डल्ला

30 lakh lamps from mirage cache | मिरजेत कॅशव्हॅनमधून ३० लाख लंपास

मिरजेत कॅशव्हॅनमधून ३० लाख लंपास

Next



मिरज : मिरजेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या जीपची काच फोडून ३० लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी भरदिवसा झालेल्या चोरीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शनिवार पेठेतील सतारमेकर गल्लीत स्टेट बँकेचे एटीएम आहे. दुपारी एक वाजता एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एसआयएस या एजन्सीचे तीन कर्मचारी जीपमधून (एमएच १० बी ५५८) आले. एटीएममध्ये दहा लाख रुपये भरण्यासाठी बाबासाहेब कांबळे, प्रशांत काटकर, दिगंबर धुमाळ (रा. सांगली) हे कर्मचारी गेले.
उर्वरित ३० लाखांची रक्कम असलेली बॅग त्यांनी जीपमध्येच ठेवली होती. तिघेही कर्मचारी गेल्याची संधी साधून रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपची काच फोडून ३० लाखांची रक्कम असलेली बॅग चोरून नेण्यात आली. काच फुटल्याचा आवाज आल्याने येथील दुकानदार दिलीप चौगुले यांनी पाहिले असता जीपच्या खिडकीतून हात घालून बॅग चोरून नेताना एक चोरटा त्यांना दिसला. त्यांनी आरडाओरडा करून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा बॅग घेऊन थोड्या अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसला आणि दोघे महावितरण कार्यालयाच्या दिशेने पळून गेले.
भरदिवसा ३० लाखांची रोकड लंपास झाल्याच्या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक
कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक बाजीराव
पाटील, सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी पाहणी केली.
खासगी एजन्सीमार्फत स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यात येतात. सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून ६० लाख रुपये घेऊन शनिवार पेठेसह तीन ठिकाणी एटीएममध्ये ३० लाख रुपये भरण्यात आले होते.
उर्वरित ३० लाखांच्या रखमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. ३० लाख रुपये गाडीत ठेवून एजन्सीचे तिन्ही कर्मचारी एकाचवेळी एटीएमकडे गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. याप्रकरणी कंपनीचा कर्मचारी दिगंबर महादेव धुमाळ याने शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
परप्रांतीय टोळीकडून चोरीचा अंदाज
एजन्सीच्या तिन्ही कर्मचाऱ्यांकडे संशयावरून पोलिसांनी कसून चौकशी केली. तिघांना तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्या चौकशीत धागेदोरे सापडले नाहीत. आंध्रप्रदेश किंवा तेलंगणा राज्यात वाहनांच्या काचा फोडून रोख रोकड चोरी करणाऱ्या टोळ्या आहेत. अशा परप्रांतीय टोळीने एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या वाहनावर पाळत ठेवून रकमेवर डल्ला मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: 30 lakh lamps from mirage cache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.