दुसऱ्या दिवशी ३० शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:20+5:302021-02-05T07:11:20+5:30
कोल्हापूर : शासन निर्देशानुसार इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्याच्या प्रक्रियेचा बुधवारपासून प्रारंभ झाला. या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर ...
कोल्हापूर : शासन निर्देशानुसार इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्याच्या प्रक्रियेचा बुधवारपासून प्रारंभ झाला. या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरातील ३० शाळा सुरू झाल्या. या वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्याही वाढली. महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध शाळांमधील १३३२ शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे.
जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकूण १५७८ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये शहरातील १११ शाळांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता शाळांकडून घेतली जात असल्याने आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार झाले आहेत. त्यानुसार ते शाळा व्यवस्थापनांना संमतीपत्रे देत आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यासह त्यामधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्या वाढत आहे. शहरातील विविध परिसरातील ३० शाळा बुधवारी सुरू झाल्या. त्यामध्ये ४६०३ विद्यार्थी उपस्थिती राहिले. ४२२ शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झाली. त्यातील १९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २४७ शिक्षकांचे अहवाल अप्राप्त आहेत. २९५३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्रे दिली आहेत. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालक सकारात्मक आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच शाळांनी इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करावयाचे आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस.के. यादव यांनी बुधवारी दिली.
चौकट
पहिला दिवस मजेत
शाळेत आल्याने खूप छान वाटत आहे. रोज किमान चार तास तरी वर्ग भरावेत, अशी प्रतिक्रिया लक्षतीर्थ वसाहत (फुलेवाडी) मधील आर्या इंगवले हिने व्यक्त केली. खूप दिवसांनी वर्गात बसल्याने मस्त वाटले. कोरोनामुळे थोडी भीती वाटत होती. पण, आज शाळेत आल्यानंतर ती दूर झाल्याचे गोकूळ शिरगावमधील प्रसाद हेंबाडे याने सांगितले. प्रत्यक्षात वर्गामध्ये बसून शिक्षण घेण्याचा खूप आनंद वाटल्याचे जवाहरनगरमधील आदिती भोसले हिने सांगितले. आज प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने छान वाटले. पहिला दिवस खूप मजेत गेल्याचे शिवाजीपेठेतील आदिश पाटील याने सांगितले.