पावसाने मारली दडी, तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ३० टक्के भरलेलीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:57 AM2022-06-29T11:57:22+5:302022-06-29T11:57:49+5:30
मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे.
कोल्हापूर : पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना, धरणांनी मात्र ती काहीअंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जून संपत आला असताना अजूनही जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजून आठवडाभरानंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचा हवामानाचा अंदाज पाहता, हे पाणी जिल्ह्याची तहान भागविण्यास पुरेसे आहे.
मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे. आता अधुनमधून पावसाच्या सरी येत असल्याने पिकांची पाण्याची गरजही कमी होऊन उपसाही कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैनंतर अतिवृष्टी झाली, तर ऑगस्ट सुरू होता होताच पूरस्थिती निर्माण होऊ शकते, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातील विसर्ग कायम ठेवला आहे. राधानगरी, वारणा, तुळशी, काळम्मावाडी या चार मोठ्या धरणांतून आजच्या घडीला २१६० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
महापूर लांबणार
गेल्यावर्षी २२ जुलैलाच पूर आला होता, तत्पूर्वी २० जूनच्या दरम्यान पहिला पूर येऊन गेला होता. यावर्षी वळवाचा पाऊस देखील जास्त काळ झालेला नाही, त्यामुळे जमिनी तहानल्या आहेत. त्यामुळे आता दडी मारलेला पाऊस पुढील आठवड्यात कोसळू लागला तरी, किमान पहिले दोन-चार दिवस तरी तो शिवारातच मुरणार आहे. मग पाणी वाहण्यास सुरुवात होऊन ते नदी, नाल्याकडे धाव घेणार आहे. त्यामुळे महापूर किमान महिनाभर तरी लांबणार आहे. आता दडी मारलेल्या पावसाचा हा मोठा फायदा असणार आहे.
अतिरिक्तची धास्ती कायम
कमी दिवसात जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज पाहता, सलग आठ दिवसाच्या पावसाने देखील धरणे फुल्ल होऊ शकतात. धरणांतून विसर्ग वाढल्यानंतर महापुराचे संकट गडद होत जाते. त्यामुळे धरणे रिकामी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. पण कोल्हापुरात अजूनही धरणांमध्ये ३० टक्के साठा आहे. २०१९ मध्ये महापूर आला, त्यावेळी हा साठा केवळ २ ते ३ टक्के इतकाच होता, तरीदेखील धरणे भरली आणि पुरात बुडवले होते. त्यामुळे अतिरिक्त साठा अजूनही धास्तावणाराच आहे.
धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
- राधानगरी (२.३८) २८ टक्के
- तुळशी (१.३७) ४० टक्के
- वारणा (१०.२७) ३० टक्के
- दूधगंगा (५.९१) २३ टक्के